ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी होणार असून, अतिरिक्त फिरकी गोलंदाजाच्या स्थानासाठी वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर यांच्यात चुरस असेल.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीची बुधवारी ‘बीसीसीआय’च्या मुख्यालयात बैठक होणार असून, कर्णधार विराट कोहली मँचेस्टरवरून आणि प्रशिक्षक रवी शास्त्री लंडनहून हजेरी लावतील. या महत्त्वाच्या बैठकीला ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव शाह (निवड समितीच्या बैठकीचे समन्वयक) हेसुद्धा उपस्थिती राखतील.

बऱ्याचशा संघांनी १५ सदस्यीय संघ घोषित केला आहे. मात्र ‘बीसीसीआय’कडून १८ ते २० सदस्यीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर २३ ऐवजी ३० जणांचा पथकात समावेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यजुवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकीपटूंचे भारतीय संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. परंतु ‘आयपीएल’मध्ये लक्ष वेधणारा वरुण आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रभावी कामगिरी करणारा राहुल हेसुद्धा स्पर्धेत आहेत.

ऋषभ पंतसाठी के. एल. राहुल हा राखीव यष्टिरक्षकाचा पर्याय संघात उपलब्ध आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ा चार षटके गोलंदाजी करण्यास असमर्थ असल्यास शार्दूलचा पर्याय उपलब्ध आहे. सूर्यकुमार यादवची निवड निश्चित मानली जात आहे, श्रेयस अय्यरसुद्धा पुनरागमन करू शकेल. अतिरिक्त सलामीवीरासाठी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दावेदारी केली आहे.

भारताच्या वेगवान माऱ्याची जसप्रित बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्यावर प्रमुख भिस्त असेल, तर दीपक चहर आणि मोहम्मद सिराज हे चौथ्या स्थानासाठी उत्सुक आहेत.

भारताचा संभाव्य संघ

’  निश्चित (१४) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमरा, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर

’  अतिरिक्त सलामीवीर : शिखर धवन / पृथ्वी शॉ

’  राखीव यष्टिरक्षक : इशान किशन / संजू सॅमसन

’  अतिरिक्त फिरकी गोलंदाज : वरुण चक्रवर्ती / राहुल चहर

’  अतिरिक्त डावखुरा वेगवान गोलंदाज : चेतन सकारिया / टी. नटराजन

’  तंदुरुस्तीनुसार : वॉशिंग्टन सुंदर

’  जडेजा नसल्यास : अक्षर पटेल / कृणाल पंडय़ा