कोलकाता : विल जॅक्सच्या (२२ चेंडूंत नाबाद ५३ आणि १/३४) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्यात इटलीवर २४ धावांनी विजय मिळवत ‘अव्वल आठ’ फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
प्रथम फलंदाजी करताना जॅक्सच्या आक्रमक खेळामुळे इंग्लडने ७ बाद २०२ धावा केल्या. जॅक्सने आपल्या खेळीत तीन चौकार व चार षटकार लगावले. त्यामुळे संघाला २००चा आकडा गाठता आला. आव्हानाचा पाठलाग करणार्या इटलीने दमदार कामगिरी केली. त्यामुळे एकवेळ इटलीचे सामन्यावर वर्चस्व होते. मात्र, इंग्लंडने वेळेत पुनरागमन केले. इटलीकडून बेन मानेंटीने २५ चेंडूंत ६० आणि ग्रँट स्टीवर्टने २३ चेंडूंत ४५ धावा केल्या. जॅक्सने मानेंटीला बाद करीत इंग्लंडच्या अडचणी दूर केल्या. इटलीच्या संघाला २० षटकांत १७८ धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करन (३/२२) आणि जेमी ओर्व्हटन (३/१८) यांनी चांगली गोलंदाजी केली.
एकवेळ इटलीची धावसंख्या ३ बाद २२ अशी होती. मात्र, बेनने आक्रमक खेळी करीत २२ चेंडूंतच अर्धशतक साजरे केले. त्याने जॅक्सच्या एकाच षटकात दोन चौकार व दोन षटकारांसह २१ धावा केल्या. जस्टिन मोस्काने त्याला साथ देत ३४ चेंडूंत ४३ धावा केल्या. दोघांनीही ४८ चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली. मात्र, जॅक्सने बेनला माघारी धाडत ही भागीदारी मोडीत काढली.
त्यापूर्वी, इंग्लंडने निर्णायक सामन्यात पुनरागमन केले. मात्र, ठरावीक अंतराने त्यांचे गडी होण्याची समस्या कायम राहिली. एकवेळ इंग्लंडची अवस्था ५ बाद १०५ अशी होती. यानंतर जॅक्स व सॅम करन (१९ चेंडूंत २५) यांनी चांगली भागीदारी केली. दोघांनीही सहाव्या गड्यासाठी २५ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. प्रथम फलंदाजी करणार्या. इंग्लंडकडून फिल सॉल्टने (२८) आक्रमक खेळ केला. पाचव्याच षटकात इंग्लंडच्या ५० धावा झाल्या होत्या. सॉल्ट व जोस बटलर (३) बाद झाल्यानंतर जेकब बेथेलने २३ धावा केल्या. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. टॉम बँटननेही २१ चेंडूंत ३० धावा केल्या.

