टी २० वर्ल्डकपमध्ये पात्रता फेरीचे सामने सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं उपांत्य फेरीबाबत भाकीत वर्तवलं आहे. सुपर १२ मधील चार संघांना त्यांनी पसंती दिली आहे. ब्रॉड यांच्या मते उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे पोहोचतील. माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांच्या यू-ट्यूब चॅनेलवर चर्चेदरम्यान त्यांनी याबाबतची भविष्यवाणी केली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाला त्यांनी पसंती दिलेली नाही. हा वर्ल्डकप भारत किंवा पाकिस्तान जिंकेल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

“माझ्या मते गट १ मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत पोहोचतील. तर गट २ मधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचतील.”, असं ब्रॅड हॉगने सांगितलं. “पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो मात्र यासाठी त्यांना भारताला पराभूत करावं लागेल”, असं त्यांनी स्पष्ट केलं. “भारताविरुद्धचा पहिला सामना पाकिस्तानने गमवल्यास त्यांच्याकडे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकत पुनरागमन करण्याची खूप कमी संधी आहे. त्यामुळे थोडं गणित बदलेल. पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना गमवल्यास उपांत्य फेरीत स्थान मिळवणं कठीण आहे. अशात भारत उपांत्य फेरीत नक्की पोहोचेल”, असंही ब्रॅड हॉग यांनी सांगितलं.

भारताने टी २० वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. सराव सामन्यात इशान किशन, रोहित शर्मा, केएल राहुल यांनी चांगली कामगिरी केली आहे.

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

स्टँड-बाय खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल</p>