दुबई : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी सराव सत्रामध्ये गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीसह त्याने सहाव्या क्रमांकावर आपली दावेदारी मजबूत केली आहे.

मागील रविवारी पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवला होता. या सामन्यात फलंदाजी करताना उजव्या खांद्याला चेंडू लागून हार्दिकला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी त्याने भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली सराव केला. तसेच साधारण २० मिनिटे त्याने भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांना गोलंदाजी केली.

जायबंदी गप्टिल भारताविरुद्ध खेळण्याबाबत साशंकता

शारजा : न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या पायाला दुखापत झाली असून भारताविरुद्ध सामन्यात तो खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने टाकलेला एक चेंडू गप्टिलच्या पायाला लागला. त्यामुळे सामन्यानंतर त्याला चालताना अडचण येत होती, असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी सांगितले. ‘‘सामना संपल्यावर गप्टिलला हालचाल करताना अडचण जाणवत होती. पुढील २४ ते ४८ तास महत्त्वाचे असून त्यानंतरच आम्ही त्याच्याबाबतचा निर्णय घेऊ शकू,’’ असे स्टेड म्हणाले.

ट्वेन्टी-२० क्रमवारीत कोहली, राहुलची घसरण

’ दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर के. एल. राहुल यांची ‘आयसीसी’च्या ट्वेन्टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे एक आणि दोन स्थानांची घसरण झाली आहे. कोहली ७२५ गुणांसह पाचव्या, तर राहुल ६८४ गुणांसह आठव्या स्थानी आहे.भारताविरुद्ध नाबाद ७९ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान चौथ्या स्थानी पोहोचला आहे.