भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान खेळाडू हार्दिक पंड्याच्या दुखापतीबाबत टीम मॅनेजमेंटने वक्तव्य केले आहे. रविवारी पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. हार्दिकची दुखापत किरकोळ असल्याचे समजते. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर टीम मॅनेजमेंटने मोठा खुलासा केला आहे.

पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना हार्दिकच्या खांद्याला दुखापत झाली होती. या सामन्यात तो काही विशेष करू शकला नाही आणि ८ चेंडूत ११ धावा करून बाद झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेशी त्याच्या दुखापतीबद्दल बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हार्दिकच्या खांद्याचा स्कॅन रिपोर्ट आला आहे आणि दुखापत फारशी गंभीर नाही, भारत सहा दिवसांनी त्यांचा सामना खेळेल त्यामुळे हार्दिकला बरे होण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल. तरी देखील वैद्यकीय पथक प्रतीक्षा करेल आणि प्रशिक्षणादरम्यान हार्दिकला कसं वाटतं हे तपासेल.”

पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव

टी-२० वर्ल्डकपमध्ये जेतेपदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला पराभूत न करू शकणाऱ्या पाकिस्तानने विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आणि भारताला मोठा झटका दिला.