T20 World Cup: पाकिस्तानविरोधील पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का, हार्दिक पंड्या संघाबाहेर?

भारतीय संघाची चिंता वाढवणारी अजून एक माहिती समोर आली आहे

T20 World Cup, Hardik Pandya, India vs Pakistan, Ind vs Pak,
भारतीय संघाची चिंता वाढवणारी अजून एक माहिती समोर आली आहे (Photo: Reuters)

टी-२० वर्ल्डकपमध्ये जेतेपदाचे दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात मोठा झटका बसला आहे. रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक माऱ्यानंतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आझमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला पराभूत न करु शकणाऱ्या पाकिस्तानने विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आणि भारताला मोठा झटका दिला. दरम्यान भारतीय संघाची चिंता वाढवणारी अजून एक माहिती समोर आली आहे.

T20 WC: विराट कोहलीकडून बाबरचं अभिनंदन तर रिझवानला मिठी; पाकिस्तान क्रिकेट बोर्डही म्हणाले, “हेच आहे…”

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या उजव्या हातावर चेंडू लागल्यामुळे स्कॅनसाठी पाठवण्यात आलं आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यादरम्यान हार्दिकच्या हातावर चेंडू लागला होता. हार्दिक या सामन्यात आठ चेंडूंवर फक्त ११ धावा करु शकला. हातावर चेंडू लागल्यामुळे जायबंदी झालेली हार्दिक पांड्या क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. विस्फोटक फलंदाज अशी ओळख असणारा हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे विराट कोहलीची चिंता वाढली आहे.

पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते. मात्र, कोहलीच्या संघाला अपेक्षित खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवान आणि आझम या भरवशाच्या सलामीवीरांनी या वर्षांतील चौथी शतकी भागीदारी रचली. रिझवानने ५५ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आझमने ५२ चेंडूत सहा चौकार, दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

VIDEO : “तुम्ही रोहितला संघाबाहेर करणार का?”, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना विराटला आलं हसू!

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावाच करता आल्या. रोहित शर्मा (०) आणि के. एल. राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तात माघारी पाठवले. तसेच सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर मात्र कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गडय़ासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने ऋषभला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. त्यामुळे भारताला जेमतेम १५० धावांचा टप्पा पार करता आला.

कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत अखेरची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. यापूर्वी भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पाचही विजय महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मिळवले होते. २०१७च्या चॅम्पियन्स करंडकातील अंतिम फेरीत भारताला कोहलीच्याच नेतृत्वाखाली पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, आताच्या पराभवामुळे कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावरही चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. यापूर्वी भारताने दोन्ही विश्वचषकात पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले होते. भारताने त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकात सात (१९९२, १९९६, १९९९, २००३, २०११, २०१५, २०१९) आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात पाच (२००७मध्ये दोन वेळा, २०१२, २०१४, २०१६) सामने जिंकले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup hardik pandya taken for scan after being hit on shoulder in match against pakistan sgy

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या