टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारताला अजून एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या करो-वा-मरो सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर सपशेल शरणागती पत्करली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याप्रमाणे भारताच्या रोहित शर्मा, केएल राहुल यांना मोठी खेळी करता आली नाही. शिवाय, दोन्ही सामन्यात मिळून भारतीय गोलंदाजांना २ विकेट्स घेता आल्या. न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव झाल्यानंतर हताश झालेल्या विराट कोहलीने निराशा व्यक्त केली.

सामन्यानंतर विराट म्हणाला, ”हे निर्दयी होते. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघांड्यावर आम्ही धाडसी नव्हतो. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमची देहबोली कमकुवत होती, तर न्यूझीलंड संघाची तीव्रता आणि देहबोली चांगली होती. जेव्हा आम्ही पहिल्या डावात धावा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही संधी साधल्या आणि विकेट गमावल्या. यामुळे आम्ही शॉटसाठी जावे की नाही याबद्दल संकोच करत होतो. भारताकडून खेळताना खूप अपेक्षा असतात. लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे आणि त्याचा सामना केला पाहिजे. आम्ही या दोन सामन्यांमध्ये तसे केले नाही आणि म्हणूनच आम्ही जिंकलो नाही. आपण आशावादी आणि सकारात्मक असायला हवे आणि मोजून जोखीम पत्करली पाहिजे. आम्हाला दबावापासून दूर राहावे लागेल आणि आमची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल आणि सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल. या स्पर्धेत खेळण्यासाठी भरपूर क्रिकेट शिल्लक आहे.”

हेही वाचा – आनंद महिंद्रांनी दिलेला शब्द पाळला; नीरजला गिफ्ट केली ‘ती’ खास कार, पाहा फोटो

असा रंगला सामना…

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली. दुबईच्या मैदानावर आज भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रचत न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धुसर झाली आहे.