टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत पाकिस्तानने विजयारंभ करत भारताला मात दिली. वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान पहिल्यांदा भारताला हरवण्यात यशस्वी ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्ताने प्रत्युत्तरात १० गडी राखून हे आव्हान सहज पूर्ण केले. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तानसाठी अभेद्य भागीदारी रचली.

सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमची चर्चा सर्वत्र होती, पण मोहम्मद रिझवानने तडाखेबंद खेळ करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखले. त्याने यष्टीरक्षणातही दोन झेल घेतले आणि फलंदाजीत ६ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावा कुटल्या. सामना संपल्यानंतर भारताचा कप्तान विराट कोहलीला त्याने मिठी मारली. विराटनेही त्याचे कौतुक करत डोक्यावरून हात फिरवला. या दोघांच्या कृतीतून खेळभावनेचे दर्शन घडले. विराट-रिझवानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – T20 WC: पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभूत झाल्यानंतर विराट म्हणतो…

टी-२० स्पर्धेत भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ ठरली. बाबर-रिझवान जोडीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखले. टी-२० मध्ये कोणत्याही विकेटसाठी भारताविरुद्ध पाकिस्तानची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. २०१२ साली अहमदाबादमध्ये मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांनी चौथ्या गड्यासाठी भारताविरुद्ध १०६ धावांची भागीदारी केली होती. हफीज आणि मलिक हे दोघेही आताच्या पाकिस्तान संघाचे भाग आहेत.