टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अव्वल-१२ फेरीला सुरुवात होण्यापूर्वी भारताने सराव सामन्यात इंग्लंडला ७ गड्यांनी मात देत विजयारंभ केला आहे. आयसीसी अकादमीच्या मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि मोईन अली या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतल्यामुळे इंग्लडने भारताला २० षटकात १८९ धावांचे आव्हान दिले आहे. आयपीएलमुळे ईऑन मॉर्गनने विश्रांती घेतल्याने जोस बटलरने आज इंग्लंडचे नेतृत्व केले. प्रत्युत्तरात सलामीवीर इशान किशन आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने एक षटक राखून हा विजय नोंदवला.

भारताचा डाव

केएल राहुल आणि इशान किशन यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. तिसऱ्या षटकात इशानला दोन वेळा जीवदान मिळाले. पाचव्या षटकात या दोघांनी भारताचे अर्धशतक पूर्ण केले. केएल राहुलने आयपीएलमधील फॉर्म कायम राखत फटकेबाजी केली. ७ षटकात भारताने बिनबाद ७३ धावा केल्या. नवव्या षटकात राहुलने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, पण तो पुढच्याच चेंडूवर झेलबाद झाला. मार्क वूडने त्याला झेलबाद केले. राहुलने ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. राहुल बाद झाल्यानंतर इशानने मोर्चा सांभाळला. त्याने १२व्या षटकात आदिलव रशीदला उत्तुंग षटकार ठोकत भारताचे शतक पूर्ण केले. याच षटकात त्याने रशीदला अजून एक षटकार ठोकत वैयक्तिक ५० धावांचा टप्पा ओलांडला. १२ षटकात भारताने १ बाद १२३ धावा केल्या. पुढच्याच षटकात भारताचा कप्तान विराट कोहली (११) माघारी परतला. १६व्या षटकात इशानला अजून एक जीवदान मिळाले. लिव्हिंगस्टोनने त्याचा सोपा झेल सोडला. इशानने वैयक्तिक ७० धावांवर तंबूत परतण्याचा निर्णय घेतला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. इशाननंतर मैदानात आलेला सूर्यकुमारही फार काही करू शकला नाही, १८व्या षटकात तो झेलबाद झाला. मात्र पुढच्या षटकात ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पंतने १४ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या.

इंग्लंडचा डाव

जोस बटलर आणि जेसन रॉय यांनी इंग्लंडच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह यांना धावा कुटल्या. चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बटलरचा (१८) त्रिफळा उद्ध्वस्त केला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात शमीने दुसरा सलामीवीर रॉयला झेलबाद केले. ६ षटकात इंग्लंडने २ बाद ५१ धावा केल्या. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला थोडा आधार दिला. पण १०व्या षटकात मलान त्रिफळाचीत झाला. फिरकीपटू राहुल चहरने त्याला तंबूचा मार्ग दाखवला. १० षटकात इंग्लंडने ३ बाद ७९ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने झटपट खेळी केली. बेअरस्टोसह त्याने इंग्लंडला शतकी पल्ला ओलांडून दिला. १५व्या षटकात शमीने पुन्हा गोलंदाजीला येत भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने लिव्हिंगस्टोनचा अडथळा दूर केला. लिव्हिंगस्टोनने ४ चौकार आणि एका षटकारासह ३० धावा केल्या. १५ षटकात इंग्लंडने ४ बाद १३० धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मोईन अलीने फटकेबाजी केली. डावाच्या शेवटी बुमराहने बेअरस्टोला अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. १९व्या षटकात तो ४ चौकार आणि एका षटकारासह ४९ धावा करून माघारी परतला. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या शेवटच्या षटकात मोईनने २० धावा फटकावल्या. इंग्लंडने २० षटकात ५ बाद १८८ धावा कुटल्या. मोईनने २० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा ठोकल्या. भारताकडून शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले.

रोहित-राहुल करणार ओपनिंग

नाणेफेकीनंतर विराटने या वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सलामी कोण देणार, याचे उत्तर दिले. आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात असलेला केएल राहुल आणि रोहित शर्मा भारतासाठी सलामी देतील. कप्तान विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार आहे.

दोन्ही संघ

भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली (कप्तान), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती

इंग्लंड संघ: जेसन रॉय, डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (कप्तान आणि यष्टीरक्षक), इऑन मॉर्गन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, मार्क वूड, आदिल रशीद, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, सॅम बिलिंग्स