टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. भारताच्या १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तान संघाने १७.५ षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने १५२ धावांची अभेद्य भागादारी रचली. या पराभवासोबत भारताच्या नावावर वाईट कामगिरीची नोंद झाली आहे.

पाकिस्तानने पहिल्यांदाचा विश्वचषक स्पर्धेत भारतावर सरशी साधली. शिवाय, टी-२० स्पर्धेत भारताला १० गडी राखून पराभव स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ ठरली. बाबर-रिझवान जोडीने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखले. टी-२० मध्ये कोणत्याही विकेटसाठी भारताविरुद्ध पाकिस्तानची ही सर्वोच्च भागीदारी ठरली. २०१२ साली अहमदाबादमध्ये मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांनी चौथ्या गड्यासाठी भारताविरुद्ध १०६ धावांची भागीदारी केली होती. हफीज आणि मलिक हे दोघेही आताच्या पाकिस्तान संघाचे भाग आहेत.

हेही वाचा – T20 WC: भारताला पराभूत करताच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्वीट; “बाबर, आझम, शाहिन…”

या सामन्यापूर्वी….

या सामन्यापूर्वी वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा नेहमीच वरचष्मा राहिला होता. १९९२च्या एकदिवसीय विश्वचषकापासून विजयाचा सिलसिला सुरू झाला. एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत ७ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला ५ वेळा हरवले आहे. म्हणजेच एकूणच भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२ वेळा विजय मिळवला होता.