दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील खेळाडू क्विंटन डीकॉकने ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवत गुडघा टेकून बसण्यास नकार दिला. यासाठी त्यानं ट्वेन्टी-२० विश्वचषकातील विंडीजविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली. यानंतर आता डीकॉकचा आयपीलच्या मुंबई इंडियन संघातील सहकारी आणि वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्डने यावर प्रतिक्रिया दिलीय. वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी गुडघे टेकण्यास डीकॉकने नकार दिला हे मला बातम्यांमधूनच समजलंय. याबाबत नेमकं काय झालंय याची माहिती नसल्याची प्रतिक्रिया पोलार्डने दिलीय.

कायरन पोलार्ड म्हणाला, “डीकॉकबाबत मला सध्या बातम्यांमधूनच समजलंय. एखाद्या खेळाडूने वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यास नका दिल्याची माहिती मला आत्ता तरी नाही. याबाबत मी सत्य काय आहे हे समजून घेऊनच प्रतिक्रिया देईल. त्यामुळे आत्ताच या घडामोडींबाबत अंदाज वर्तवू नये अशी माझी विनंती आहे. मला व्यक्तीशः आणि संघाला देखील वर्णद्वेष संपावा असं वाटतं. त्यासाठी आम्ही आमच्या वाट्याचा छोटासा भाग करतो आहोत.”

“वर्णद्वेषावर योग्य मत तयार होण्यासाठी शिक्षण महत्त्वाची गोष्ट”

“या मुद्द्यावर आमची भूमिका काय आहे हे सर्वांना माहिती आहे. याबाबत नागरिक म्हणून, संघ म्हणून आम्हाला खूप प्रकर्षानं वर्णद्वेष संपावा असं वाटतंय. त्यासाठी आम्ही काम करत राहू. या मुद्द्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र विचार आहेत. मला वाटतं वर्णद्वेषावर योग्य मत तयार होण्यासाठी शिक्षण महत्त्वाची गोष्ट आहे,” असंही पोलार्डनं नमूद केलं.

कोणत्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार : डीकॉक

दरम्यान, डीकॉकच्या निर्णयाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यस्थापनाला धक्का बसलाय. त्यांच्या अहवालानंतर ‘सीएसए’ पुढील पावले उचलणार आहे. ‘‘क्विंटन डीकॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुडघा टेकून बसण्यास नकार देण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला याची दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाने दखल घेतली आहे,’’ अशी सीएसएने प्रतिक्रिया दिली. डीकॉकने यापूर्वीही वर्णद्वेषविरोधी मोहिमेची कृती करण्यास नकार दिला होता. ‘‘कोणत्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीची सक्ती करू शकत नाही,’’ असे डीकॉक काही काळापूर्वी म्हणाला होता.

‘सीएसए’ने त्यांच्या खेळाडूंना कृष्णवर्णीय नागरिकांची हत्या आणि अत्याचाराच्या विरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवणे सक्तीचे केले. दक्षिण आफ्रिकेत पूर्वी कृष्णवर्णीयांचा क्रिकेटमध्येही समावेश केला जात नव्हता. मात्र, आता परिस्थितीत बदल झाल्याचा संदेश ‘सीएसए’ला द्यायचा आहे.

हेही वाचा : T20 World Cup : वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यास डीकॉकचा नकार

कर्णधार बव्हूमाकडून समर्थन

डीकॉकने उचललेल्या पावलाचे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बव्हूमाने समर्थन केले. सीएसएने सामन्याला सुरुवात होण्यास काही तास असताना अशाप्रकारचा निर्णय घेणे योग्य नव्हते, असे दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बव्हूमा म्हणाला. ‘‘डीकॉक आमचा सहकारी आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. त्याला कोणताही संदेश द्यायचा झाल्यास आम्ही अंतर्गत चर्चा करू,’’ असे बव्हूमाने स्पष्ट केले.