टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत नामिबिया क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. पात्रता सामन्यात नामिबियाने आयर्लंडचा ८ गडी राखून पराभव करत गट अ मधून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवले आहे. कसोटी खेळणारा आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी बाद १२५ धावाच करू शकला. प्रत्युत्तरात कर्णधार गेरहार्ड इरास्मस (नाबाद ५३) च्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर नामिबियाने १८.३ षटकांत २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले. कर्णधार इरास्मसने १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर, तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड वीसने (नाबाद २८) चौकारासह संघाला विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इरास्मसने चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याचवेळी, वीसने १४ चेंडूत एक चौकार आणि २ षटकार ठोकले. वीसने डावाच्या १५ व्या षटकात सलग चेंडूंत दोन षटकार ठोकून सामना नामिबियाच्या दिशेने फिरवला. त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले. वीसने २२ धावांत २ बळीही घेतले. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळलेला वीस या वर्ल्डकपमध्ये नामिबियाकडून खेळत आहे.

हेही वाचा – ‘‘मी खेळले तर युवा खेळाडूंना पदके मिळणार नाहीत, म्हणून…”, विश्वविजेती बॉक्सर मेरी कोमचा खुलासा

१२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला संघाच्या २५ धावसंख्येवर पहिला धक्का बसला, सलामीवीर क्रेग विल्यम्सला कर्टिन्स कॅम्फरने बाद केले. यानंतर, कर्णधार गेरहार्ड इरास्मस, यष्टीरक्षक-फलंदाज जेन ग्रीन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. ग्रीनलाही कॅम्फरने झेलबाद केले. त्याने ३२ चेंडूत संयमी खेळी केली. तत्पूर्वी, नामिबियन गोलंदाजांच्या नेत्रदीपक कामगिरीसमोर आयर्लंडला १२५ धावाच करता आल्या. नामिबियन गोलंदाजांनी आयर्लंडच्या फलंदाजांवर दडपण ठेवले. त्यांच्यासाठी जेन फ्रँकलिंन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने चार षटकांत २१ धावा देऊन ३ बळी घेतले.

आता लढत भारताशी…

स्कॉटलंड आणि नामिबिया हे दोन संघ भारताच्या गटात सामील झाले आहेत. भारताने २००३च्या वर्ल्डकपमध्ये नामिबियाविरुद्ध सामना खेळला होता. सचिन आणि गांगुलीने त्या सामन्यात शतके केली. भारताचा पहिला टी-२० विश्वचषक सामना २००७ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध झाला. महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वाची सुरुवात या सामन्यात केली. आता सुपर १२ गटात भारताचा ५ नोव्हेंबरला स्कॉटलंडशी, तर ८ नोव्हेंबरला नामिबियाशी सामना होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup namibia are through to the super 12 adn
First published on: 22-10-2021 at 19:55 IST