टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीला सुरुवात होऊन दोन दिवस झाले आहेत. पात्रता फेरीत आयर्लंडच्या कॅम्फरनं चार चेंडूत चार विकेट्स, तर स्कॉटलँडने बांगलादेशला पराभूत केल्याने मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. वर्ल्डकपमध्ये घडामोडी घडण्यास सुरु असता नामिबियाच्या खेळाडूने मैदानात पाय ठेवताना इतिहास रचला आहे. नामिबियाच्या डेविड विसीने मैदानात उतरताच दोन देशांकडून वर्ल्डकप खेळण्याचा मान मिळवला आहे.

डेविड विसी २०१६ टी २० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता. मात्र आता नामिबिया संघाकडून यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. त्यामुळे दोन देशांकडून दोन वर्ल्डकप खेळण्याचा मान डेविड विसीला मिळा आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात डेविड विसी फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र ७ चेंडूत ६ धावा करून तंबूत परतला. चमिका करुणारत्नेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. गोलंदाजीतही विसी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने दोन षटकं टाकली आणि ११ धावा दिल्या.

टी २० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत श्रीलंकेनं नामिबियाचा ७ गडी आणि ३९ चेंडू राखून पराभव केला. नामिबीयाने श्रीलंकेला विजयासाठी ९७ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेनं १३ षटकं आणि ३ चेंडूत ३ गडी गमवून पूर्ण केलं. नामिबीयाच्या खेळाडूंमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्ट दिसली. एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. टप्प्याटप्प्याने फलंदाज तंबूत परतत राहिले आणि श्रीलंकेला विजयासाठी ९७ धावा दिल्या. संघाची धावसंख्या १० असताना बार्ड बाद झाला. त्यानंतर झेन ग्रीन ८ धावा माघारी परतला. तिसऱ्या गड्यासाठी विलियम्स आणि एरास्मुस यांनी चांगली भागीदारी केली. संघाच्या ६८ धावा करेपर्यंत या जोडीने जम बसवला. मात्र ही जोडी तंबूत परतल्यानंतर त्यांच्या मागे एक एक करत सर्वच फलंदाज तंबूत परतले.