टी२० वर्ल्डकपमधला सलामीचा दिवस अतिशय नाट्यमय घडामोडींनी गाजला. कोलंबो, कोलकाता आणि मुंबईत झालेल्या सामन्यांमध्ये चाहत्यांना दर्जेदार क्रिकेटची पर्वणी मिळाली. झेल सुटल्यानंतर फहीम अशरफने पाकिस्तानला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजच्या रोमारिओ शेफर्डने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हॅट्टिक नोंदवली. जेतेपदाचे प्रबळ दावेदार भारतीय संघाला अमेरिकेविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला.

रोमारियो शेफर्डची किमया

रोमारियो शेफर्डने ३ षटकात अवघ्या २० धावा खर्च करून ५ गडी बाद केले. यादरम्यान त्याने हॅट्रिक घेतली. २०२६ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत हॅट्रिक घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.त्याने या सामन्यात हॅट्रिक घेण्यासह ५ गडी बाद करण्याचा पराक्रमही केला आहे. शेफर्डने आधी मॅथ्यू क्रॉसला बाद केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर मायकल लीस्क आणि पुढच्या चेंडूवर ओलिवर डेविडसनची दांडी गुल करून त्याने हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर पुढचा चेंडू निर्धाव राहिला. त्याननंतर आणखी एक विकेट घेऊन त्याने एकाच षटकात ४ विकेट्स पूर्ण केल्या आणि या डावात ५ गडी बाद केल्या.

टी२० वर्ल्डकप स्पर्धेत हॅट्टिक पटकावणारा शेफर्ड केवळ नववा गोलंदाज आहे. ब्रेट ली, कुर्तीस कॅम्फर, वानिंदू हासारंगा, कागिसो रबाडा, कार्तिक मैयप्पन, जोश लिटील, पॅट कमिन्स, ख्रिस जॉर्डन यांनी हॅट्टिक घेतली आहे. टी२० क्रिकेटमध्ये हॅट्टिक पटकावणारा शेफर्ड ८५वा गोलंदाज ठरला आहे. टी२० वर्ल्डकप स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा शेफर्ड वेस्ट इंडिजचा पहिलाच गोलंदाज आहे.

या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर ५ गडी बाद १८२ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना शिमरोन हेटमायरने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर ब्रेंडन किंगने ३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेला स्कॉटलंडचा संपूर्ण डाव १४७ धावांवर आटोपला. यासह वेस्ट इंडिजने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर केला. वेस्ट इंडिजकडून गोंलदाजी करताना रोमारियो शेफर्डने ३ षटकात अवघ्या २० धावा खर्च करून सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर जेसन होल्डरने ३० धावा खर्च करून ३ गडी बाद केले. शमार जोसेफेने २६ धावा खर्च करून १ गडी बाद केला.

झेल सुटला, सामना गेला

१४९ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची नेदरलँड्सविरुद्ध ११९/७ अशी अवस्था झाली होती. त्यांना १२ चेंडूत २९ धावा हव्या होत्या. पारडं नेदरलँड्सच्या बाजूने होतं. मात्र लोगन व्हॅन बीकच्या षटकात चित्र बदललं.

फहीम अशरफने लगावलेला फटका दौदच्या हातून निसटला. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने प्रचंड नाराजी व्यक्त केली. हा झेल सोडल्याचे परिणाम नेदरलँड्सला भोगावे लागले. फहीमने त्या षटकात २४ धावा चोपून काढल्या. ११ चेंडूत २९ धावांची खेळी करत फहीम पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

बाद फेरीत प्रवेशासाठी जास्तीत जास्त सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँड्सविरुद्धचा सामना गमावला असता तर पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला असता.

भारतीय संघाचा संघर्षमय विजय

भारतीय वंशाच्या खेळाडूंचा भरणा असलेल्या अमेरिकेच्या संघाने बलाढ्य भारतीय संघाला चांगलंच तंगवलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची ७७/६ अशी अवस्था झाली होती. सूर्यकुमार यादवच्या ४९ चेंडूत ८४ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने १६१ धावांची मजल मारली. शॅडले स्कायलॅकने ४ विकेट्स पटकावल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना अमेरिकेचे तीन शिलेदार झटपट तंबूत परतले. संजय कृष्णमूर्ती आणि शुभम रांजणे यांनी प्रत्येकी ३७ तर मिलिंद कुमारने ३४ धावा केल्या मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत अमेरिकाला वरचढ होऊ दिलं नाही. त्यांनी १३२ धावा केल्या. मोहम्मद सिराजने ३ तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.