टी २० वर्ल्डकपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान या दोन संघात २४ ऑक्टोबरला लढत आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांत वाकयुद्ध रंगलं आहे. सलामीचा सामना आम्हीच जिंकणार असं सांगत, आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला डिवचलं आहे.

“आमचं मनोबल वाढलं आहे आणि भारताविरुध्दचा सलामीचा सामना जिंकून स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करणार आहोत. स्पर्धेच्या सुरुवातीचा सामना जिंकल्यास आमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच पुढचा प्रवास सोपा होईल. मी रिझवानसोबत डावाची सुरुवात करेन. पण परिस्थिती पाहून आम्ही आमचा निर्णय बदलू शकतो”, असं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितलं. “मोहम्मद हाफीज आणि शोएब मलिक मॅच विनर आहेत. त्यांचा अनुभव आम्हाला मैदानावर मदत करेल”, असंही बाबर आझम पुढे म्हणाला.

पाकिस्ताननं आपल्या संघात तीन बदल केले आहेत. संघात हैदर अली, सरफराज अहमद आणि फखर जमानला सहभागी केलं आहे. ४ सप्टेंबरला घोषित केलेल्या संघात पाकिस्तान लीगमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर बदल करण्यात आला आहे. सरफराज अहमद आणि हैदर अली यांनी आझम खान आणि मोहम्मद हसनैन यांची जागा घेतली आहे. तर फखर जमानला राखीव खेळाडू म्हणून सहभागी केलं आहे. त्याला खुशदिल शाहच्या जागेवर घेण्यात आलं आहे.

टी २०साठी पाकिस्तानचा संघ
बाबर आझम, शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, सोहैब मकसूद