सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा आतापर्यंतचा प्रवास असा असेल, याची भारतीय चाहत्यांना तसेच सर्व क्रिकेट तज्ञांनाही अपेक्षा नव्हती. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी भारताला प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते, परंतु स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावल्यानंतर संघाचा उपांत्य फेरीचा मार्गही कठीण दिसत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने सर्वांना थक्क करत भारतीय संघाचे वर्णन सर्वोत्कृष्ट असे केले आहे. भारत पुनरागमन करेल अशी आशा त्याने व्यक्त केली.

या स्पर्धेत भारतीय संघाला त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये वाईटच फटका बसला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० गडी राखून मोठा विजय नोंदवला तर काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेट राखून विजय मिळवला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर होत असलेल्या सर्व टीकेच्या पार्श्‍वभूमीवर मोहम्मद आमिरने ट्वीट करून म्हटले, ”माझा अजूनही विश्वास आहे की भारत हा सर्वोत्तम संघ आहे, हा फक्त चांगल्या आणि वाईट काळाचा मुद्दा आहे, परंतु खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे, शेवटी हा फक्त क्रिकेटचा खेळ आहे हे विसरू नका.”

हेही वाचा – IND vs NZ: “रोहितला स्वत: लाच वाटेल, की…”, भारताच्या नव्या बॅटिंग ऑर्डरबाबत गावसकरांचं ‘मोठं’ वक्तव्य!

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट म्हणाला, ”नाणेफेकीला खूप महत्त्व आहेm पण तुम्ही तुमची खराब फलंदाजी त्यापासून लपवू शकत नाही. बऱ्याच दिवसांनी भारतीय फलंदाजांच्या चेहऱ्यावर तणाव असल्याचे मला दिसले. संघात अजिबात आत्मविश्वास वाटत नव्हता. भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास अजिबात दिसत नव्हता. ते फक्त काहीतरी चांगले घडण्याची वाट पाहत होते, पण ती संधी कधीच आली नाही.”