T20 WC Points Table After PAK vs USA Match: टी-२० विश्वचषक २०२६ मधील १२ व्या सामन्यात पाकिस्तानने अमेरिकेचा एकतर्फी पराभव केला. सलमान अली आघाच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तानने ३२ धावांनी विजय मिळवत सलग दुसरा विजय नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत १९० धावा केल्या, तर अमेरिकेचा संघ प्रत्युत्तरात फक्त १५८ धावाच करू शकला. या विजयासह, पाकिस्तानने गुणतालिकेत लक्षणीय झेप घेतली. तर भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
टीम इंडियाने अमेरिकेला हरवून फक्त एकच सामना खेळला असला तरी पाकिस्तानने गुणतालिकेत भारताला दुसऱ्या स्थानावर ढकललं आहे. सलग दोन सामने जिंकत सुपर-८ मध्ये जाण्याचा पाकिस्तानचा रस्ता सोपा झाला आहे. तर इतर तिन्ही गटांमध्येही सुपर-८ गाठण्यासाठी संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
पाकिस्तान-अमेरिका सामन्यानंतर कसं आहे टी-२० विश्वचषकाचं पॉईंट्स टेबल?
अ गटात पाकिस्तानने सलग दोन सामने जिंकले आहेत. यासह संघाचे गुण आता ४ गुण आहेत तर नेट रन रेट ०.९३२ आहे. एका विजयासह आणि एका सामन्यासह भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा नेट रन रेट +१.४५० असा कमालीचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता गट अ मधील अव्वल संघ निश्चित करेल. हे दोन्ही संघ १५ फेब्रुवारी रोजी एकमेकांशी भिडतील. या गटात नेदरलँड्स तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी दोन सामने खेळले आहेत आणि एक जिंकला आहे. नामिबिया आणि अमेरिका अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.
ब गटात कोणता संघ कितव्या स्थानी?
टी-२० विश्वचषकाच्या ब गटात झिम्बाब्वेने अव्वल स्थान पटकावलं आहे, त्यांनी एक सामना खेळला आणि तो जिंकला. श्रीलंकेनेही एक सामना खेळला आणि जिंकला, परंतु झिम्बाब्वेचा नेट रन रेट जास्त असल्याने ते पहिल्या स्थानी कायम आहेत. आयर्लंड आणि ओमान यांनी अद्याप आपलं खातं उघडलेलं नाही. या गटातील पाचवा संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाने अद्याप आपला पहिला सामना खेळलेला नाही. बुधवारी ऑस्ट्रेलियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे.
क गटात पहिल्या स्थानी कोण?
वेस्ट इंडिजचा संघ क गटात पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवत त्यांचे दोन गुण आहेत. स्कॉटलंडचेही दोन गुण आहेत, परंतु त्यांनी दोन सामने खेळून एकच सामना जिंकला आहे. इंग्लंडनेही एक सामना खेळला आणि तो जिंकला आणि त्यांचे दोन गुण झाले आहेत. तिन्ही संघांचे समान गुण असूनही, चांगल्या नेट रन रेटमुळे वेस्ट इंडिज पहिल्या स्थानावर आहे. नेपाळ आणि इटलीचे संघ अद्याप आपले खाते उघडू शकलेले नाहीत.
टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड ड गटात आघाडीवर आहे. न्यूझीलंडने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. त्यांचे चार गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेने एक सामना खेळला आहे आणि एक सामना जिंकून दोन गुण मिळवले आहेत. अफगाणिस्तान, युएई आणि कॅनडा यांना अजूनही या गटात त्यांच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. तर ११ फेब्रुवारीला अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना खेळवला जाणार आहे.

