इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात फलंदाजीचा क्रम आणि गोलंदाजीतील सहावा पर्याय ठरवण्याचे उद्दिष्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल-१२ फेरीला प्रारंभ होण्यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. त्यामुळे सोमवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात फलंदाजीचा क्रम आणि सहाव्या गोलंदाजीचा पर्याय या दोन मुद्दय़ांवर भारताला प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे लागेल.

नुकताच ‘आयपीएल’चा १४वा हंगाम संपल्यानंतर आता २४ ऑक्टोबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सलामीच्या सामन्यासाठी भारतीय खेळाडूंना लवकरच जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सोमवारी इंग्लंड आणि बुधवारी ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढय़ संघांविरुद्धच्या लढती भारताची चाचपणी करणाऱ्या ठरतील. ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघात बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन यांचा समावेश नसला, तरीही त्यांचा संघ तितकाच तुल्यबळ वाटत आहे.

रोहितच्या साथीने सलामीला कोण?

अनुभवी सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माला ‘आयपीएल’मध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही; परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषकात रोहितच पहिल्या पसंतीचा सलामीवीर असेल, यात शंका नाही. त्यामुळे रोहितच्या साथीने के. एल. राहुल आणि इशान किशन यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. राहुलचा अनुभव पाहता त्याला प्राधान्य मिळू शकते; परंतु किशनकडे पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक शैलीत फटकेबाजी करण्याची क्षमता असल्याने त्याची पडताळणी करता येऊ शकते.

मधल्या फळीत चुरस

हार्दिक पंडय़ाला फक्त फलंदाजीच्या बळावर मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागेल. कोहली आणि ऋषभ पंत यांचे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावरील स्थान पक्के असल्याने चौथ्या आणि सहाव्या स्थानासाठी सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, शार्दूल ठाकूर यांच्यात चुरस असेल.

गोलंदाजीतील सहाव्या पर्यायाची चिंता

हार्दिक सराव सामन्यात गोलंदाजी करण्याची जोखीम पत्करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. वेगवान अष्टपैलू शार्दूल सध्या लयीत असल्याने त्याला सरावाची अधिक संधी देणेही गरजेचे आहे. रवींद्र जडेजा फिरकी अष्टपैलूची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये भारताकडे जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांचे त्रिकूट उपलब्ध असून वरुण चक्रवती किंवा रविचंद्रन अश्विनपैकी एकाला संधी दिल्यास भारताकडे सहा गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध असतील.

बाबर आझमला मायदेशी न परतण्याची धमकी

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताविरुद्धच्या लढतीत पराभव पत्करल्यास मायदेशी परतू नकोस, अशी धमकी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला तेथील काही चाहत्यांकडून देण्यात आली आहे. आझमने दोन दिवसांपूर्वी अमिरातीत दाखल झाल्यावर ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका छायाचित्राखाली पाकिस्तानमधील चाहत्यांनी त्याच्यासह संघातील अन्य खेळाडूंवर निशाणा साधला. २४ तारखेला पराभूत झाल्यास पाकिस्तानात पाय ठेवू नका, भारताकडून पराभव पत्करल्यास ‘आझम, तू कर्णधारपद सोडून दे’, अशा स्वरूपातील धमक्या काहींनी दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांतील कामगिरी

खेळाडू  सा    मने    धावा/बळी

विराट कोहली    ९०     ३,१५९/४

रोहित शर्मा     १११    २,८६४/१

के. एल. राहुल   ४९     १,५५७/-

इशान किशन    ३      ८०/-

सूर्यकुमार यादव  ४      १३९/-

हार्दिक पंडय़ा    ४९     ४८४/४२

ऋषभ पंत      ३३     ५१२/-

रवींद्र जडेजा     ५०     २१७/३९

शार्दूल ठाकूर    २२     ६९/३१

रविचंद्रन अश्विन ४६     १२३/५२

वरुण चक्रवर्ती   ३      -/२

राहुल चहर      ५      ५/७

भुवनेश्वर कुमार  ५१     ५२/५०

मोहम्मद शमी   १२     -/१२

जसप्रीत बुमरा   ५०     ८/५९

.. तरच हार्दिकला खेळवावे – गंभीर

दुबई : हार्दिक पंडय़ाने सराव सामन्यात गोलंदाजी केली, तरच पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी त्याला भारतीय संघात स्थान द्यावे, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. हार्दिकने ‘आयपीएल’मध्ये एकही चेंडू न टाकल्याने वेगवान अष्टपैलू म्हणून शार्दूल ठाकूरचा पर्यायी समावेश भारताच्या मुख्य संघात करण्यात आला. ‘‘हार्दिक जर सराव सामन्यात गोलंदाजी करणार नसला तर त्याला अंतिम संघात स्थान देऊ नये. सराव सत्रात गोलंदाजी करणे आणि प्रत्यक्ष लढतीत गोलंदाजी करणे यामध्ये फार मोठा फरक आहे. या विश्वचषकासाठी हार्दिकच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीचे महत्त्व अधिक आहे,’’ असे गंभीर म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup prediction of india first practice match against england zws
First published on: 18-10-2021 at 04:45 IST