टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत दोन सामने खेळले गेले, ज्यात पहिल्याच सामन्यात यजमान ओमानने पापुआ न्यू गिनीविरुद्ध जबरदस्त विजय मिळवला, त्यानंतर संध्याकाळच्या सामन्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. स्कॉटलंडने बांगलादेश संघाचा ६ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह पत्रकार परिषदेत संघाच्या पराभवाचे कारण सांगत होता. तेव्हा, स्कॉटलंडच्या खेळाडू-चाहत्यांनी व्यत्यय आणला.

महमूदुल्लाह पत्रकार परिषदेत बोलत असताना स्कॉटिश खेळाडू विजय साजरा करत होते. यावेळी ते राष्ट्रगीत गात होते. या प्रकरानंतर महमुदुल्लाह थोडावेळ गप्प बसला. आयसीसीने इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ अपलोड केला आहे.

स्कॉटलंड क्रिकेट संघाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर या घटनेचा व्हिडिओ अपलोड केला आणि लिहिले, ‘क्षमस्व आम्ही पुढच्या वेळी कमी आवाज करू.’ त्याच वेळी, त्यांनी महमूदुल्लाच्या शांततेबद्दल कौतुक केले. सामन्यानंतर महमुदुल्ला म्हणाला, “मला वाटते, की आम्ही एक फलंदाजी गट म्हणून स्वतःला निराश केले आहे. त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आणि आपण त्या चुका कुठे केल्या हे पाहण्याची गरज आहे. पुढील सामन्यात चूक पुन्हा न करण्याचा प्रयत्न करू. मला वाटते की १४० चांगली धावसंख्या होती आणि ती गाठता आली असती. गोलंदाजांनी त्यांचे काम चोख बजावले, पण आमची फलंदाजी चांगली झाली नाही.”

हेही वाचा – विराटनं केली शिखर धवनची हुबेहुब नक्कल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “वा भाई वा!”

‘जायंट किलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. स्कॉटलंडने जबरदस्त कौशल्य दाखवत बांगलादेशला ६ धावांनी मात दिली. अल एमिरेट्स, ओमान येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार महमूदुल्लाह याने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्कॉटलंडने २० षटकांत ९ गडी बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ७ बाद १३४ धावांपर्यंत पोहोचता आले.