टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीत श्रीलंका विरुद्ध आयर्लंड या संघात झालेल्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली. श्रीलंकेने २० षटकात ७ गडी गमवून १७१ धावा केल्या. आयर्लंडला विजयासाठी १७२ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र आयर्लंडचा संघ सर्वबाद १०१ धावा करू शकला. श्रीलंकेने आयर्लंडवर ७० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह श्रीलंकेचं सुपर १२ मधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे.

आयर्लंडचा डाव

आयर्लंडला डावाच्या सुरुवातीला दोन धक्के बसले. पॉल स्टर्लिंग आणि केविन ओब्रायन झटपट बाद झाले. डेनली अवघ्या २ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार अँड्र्यु बालबीर्नीने कर्टिस कॅम्फरसोबत चांगली भागीदारी केली. मात्र महिशच्या गोलंदाजीवर कॅम्फरचा त्रिफळा उडाला. कॅम्फरने २८ चेंडूत २४ धावा केल्या. कॅम्फर बाद झाल्यानंतर एक एक खेळाडू तंबूत परतले. हॅरी टेक्टर, नेल रॉक, मार्क एडेर, अँड्र्यु बालबीर्नी, क्रेग यंग असे फलंदाज एक एक करत बाद झाले.

श्रीलंकेचा डाव

श्रीलंकेची डावाची सुरुवात अडखळत झाली. सुरुवातीला श्रीलंकेचे तीन फलंदाज झटपट बाद झाले. कुसल परेरा (०), दिनेश चंडिमल (६) आणि अविष्का फर्नांडो (०) या धावसंख्येवर तंबूत परतले. मात्र चौथ्या गड्यासाठी पथुम निसांका आणि वनिंदू हसारंगा यांनी १२३ धावांची मजबूत भागीदारी केली. तसेच संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. निसांकाने ६१, तर हसरंगाने ७१ धावा केल्या. त्यानंतर राजपक्सा आणि चमिका करुणारत्ने मोठे फटके मारण्यात अपयशी ठरले आणि बाद झाले. मात्र दासून शनाकाने ११ चेंडूत २१ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.

आयर्लंडचा संघ– पॉल स्टर्लिंग, केविन ओब्रायन, अँड्र्यु बालबीर्नी, डेलानी, कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, नेल रॉक, सिमी सिंग, मार्क एडेर, जोशुआ लिटल, क्रेग यंग

श्रीलंकेचा संघ– पथुम निसांका, कुसल परेरा, दिने चंडीमल, अविष्का फर्नांडो, वनिंदू हसरंगा, भानुका राजापक्षे, दासुन शनाका, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, महिश थीकशाना, लहिरू कुमारा