टी २० विश्वचषकाच्या सुपर १२ संघात स्थान मिळवण्यासाठी श्रीलंका संघाला पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. १८ ऑक्टोबरला नामीबिया संघाविरुद्ध पात्रता फेरीच्या पहिला सामना होणार आहे. त्यानंतर २० आणि २२ ऑक्टोबर रोजी आयर्लंड आणि नेदरलँडविरुद्ध सामने असणार आहेत. विश्वचषकासाठी श्रीलंकन निवड समितीने १५ खेळाडूंची नावे जाहीर केली होती. आता यात चार बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त असलेल्या लहिरू मदुशंका आणि नुवान प्रदीप यांच्यासोबत प्रवीण जयाविक्रमा आणि कामिंदु मेंडिस यांना संघाबाहेर करण्यात आलं आहे. त्यांच्या जागेवर पथुम निसंका, अकिला धनंजय, लहिरू कुमारा आणि बिनुरा फर्नांडो यांना स्थान देण्यात आलं आहे.

अकिला श्रीलंकेच्या टी २० आंतरराष्ट्रीय संघात खेळला आहे. आपल्या अ‍ॅक्शनमध्ये बदल केल्यानंतर त्याच्या कामगिरीवर फरक पडला आहे. मागच्या ९ टी २० सामन्यात त्याने फक्त ६ गडी बाद केले आहेत. मात्र त्याचा अनुभव पाहता त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. दुसरीकडे कामिंदु मेंडिसला संघात स्थान मिळालेलं नाही. त्याच्याऐवजी पथुम निसंकाला संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज मदुशंका आणि प्रदीप यांचा दुखापतीमुळे आराम देण्यात आला आहे.

श्रीलंका संघ- दसून शनका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, कुसल परेरा, दिनेश चांदीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजापक्षा, चरिथ असलंका, वनिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ना, दुश्मांता चमीरा, महीश थीक्षना, लहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो, अकिला धनंजय, पथुम निसंका