टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल झाले. इशान किशन आणि शार्दुलचा संघात समावेश करण्यात आला. विराटने प्रथम सांगितले, की इशान टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करेल. कदाचित रोहित शर्मा आणि इशानची जोडी सलामीला येईल, असे सगळ्यांना वाटत होते. पण अपेक्षेच्या विरुद्ध इशान आणि राहुलने डावाची सुरुवात केली आणि रोहित तिसऱ्या क्रमांकावर आला. अनेक दिग्गजांना रोहितला खाली पाठवण्याबाबत टीका केली. पराभवानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनीही रोहितबाबतच्या निर्णयावरून संघ व्यवस्थापनाला फटकारले.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने १४ चेंडूत १४ धावा केल्या. यादरम्यान पहिल्याच चेंडूवर त्याला जीवदानही मिळाले. गावसकर यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे. इंडिया टुडेशी बोलताना ते म्हणाले, ”इशान किशन हा मिस आणि हिट खेळाडू आहे आणि त्याच्यासारखा फलंदाज चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळला तर बरे होईल. त्यावेळी तो खेळाच्या परिस्थितीनुसार खेळू शकतो. आता इथे रोहितला सांगण्यात आले, की डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळण्याच्या तुझ्या क्षमतेवर आमचा विश्वास नाही, इतकी वर्ष नियमित स्थानावर खेळणाऱ्या फलंदाजाबाबत तुम्ही असे करत असाल, तेव्हा तो स्वत: च असा विचार करेल, की माझ्याकडे क्षमता नाही. जर इशान किशनने ७० धावा जलद केल्या असत्या तर आम्ही या निर्णयाचे कौतुक केले असते. पण निर्णय चुकीचा निघाला की तुमच्यावर टीका होईल.”

हेही वाचा – नीचपणाचा कळसच..! विराटच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही विकृतांनी केलं ट्रोल; पाकिस्तानचा इंझमामही भडकला

इशान किशनच्या सलामीमुळे रोहित तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि त्यामुळे कर्णधार विराट कोहलीही त्याच्या नियमित फलंदाजीच्या क्रमांकावर येऊ शकला नाही. विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे गावसकर यांचे मत आहे. ते म्हणाले, ”मला माहीत नाही की ही अपयशाची भीती आहे की नाही, परंतु मला माहित आहे की त्याने फलंदाजीच्या क्रमात जे काही बदल केले, ते अपयशी ठरले. रोहित शर्मा हा एक महान फलंदाज आहे आणि त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर इतक्या धावा करणारा कोहली स्वतःला चौथ्या क्रमांकावर आणतो. इशान किशनसारख्या युवा खेळाडूवर सलामीची जबाबदारी देण्यात आली.”