टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडियासाठी वाटचाल थोडी कठीण झाली आहे. आता भारताचा पुढील सामना या रविवारी न्यूझीलंड विरुद्ध आहे. समालोचक आणि माजी कप्तान सुनील गावसकर यांनी टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीला प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्याचे सुचवले आहे. गावसकर म्हणाले की, भारताला न्यूझीलंडला हरवायचे असेल तर प्लेईंग इलेव्हनमध्ये मध्ये दोन बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.

फॉर्मात असलेल्या इशान किशनला मॅच फिनिशर म्हणून आणि भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात सामील करून घेण्याबाबत गावसकरांनी मत दिले आहे. गावसकर स्पोर्ट्स तकवर म्हणाले, ”जर हार्दिक पंड्या खांद्याच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करू शकत नसेल तर त्याचा पर्याय म्हणून इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. कारण इशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून सराव सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली. अशा स्थितीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तो प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारच्या जागी संघ शार्दुल ठाकूरलाही संधी देऊ शकतो.”

हेही वाचा – दणका..! लाइव्ह शोमध्ये झालेल्या भांडणानंतर पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं शोएब अख्तरसह ‘त्या’ अँकरला…

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यातही हार्दिक ११ धावांवर बाद झाला. इशानने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात सलामी करताना ४६ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. टी-२० वर्ल्डकपमध्ये भुवनेश्वर कुमार फॉर्मात दिसत नाही. त्याने पाकिस्तानविरुद्ध २५ धावा दिल्या. पण एकही बळी घेऊ शकला नाही. त्याने आयपीएलच्या यूएई लेगमध्ये ६ सामन्यात फक्त ३ विकेट घेतल्या होत्या. अशा परिस्थितीत शार्दुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

शार्दुलने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात ८ सामन्यात १५ विकेट घेत चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आयपीएलमध्ये एकूण २१ विकेट घेतल्या. या कारणास्तव त्याला राखीव खेळाडूंच्या यादीतून टी-२० विश्वचषकाच्या मुख्य संघात स्थान देण्यात आले.