यंदाच्या टी२० वर्ल्डकपमध्ये एक खास विक्रम पाहायला मिळाला. एकाच वर्ल्डकपमध्ये तीन शतकवीर हा अनोखा विक्रम स्पर्धेत बुधवारी झाला. कॅनडाचा युवराज , श्रीलंकेचा पाथुम निसांका आणि पाकिस्तानचा साहिबजादा फरहान यांनी हा विक्रम प्रत्यक्षात साकारला. टी२० प्रकारात खोऱ्याने धावा निघत असल्या तरी वर्ल्डकप स्पर्धेत शतकांची संख्या अत्यंत मर्यादितच राहिली आहे.
या तिघांच्या निमित्ताने टी२० वर्ल्डकपमधल्या शतकवीरांचा घेतलेला आढावा
ख्रिस गेल
२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलने शतकी खेळी साकारली होती. जोहान्सबर्गच्या वांडरर्स मैदानावर यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गेलने ५७ चेंडूत ७ चौकार आणि १० षटकारांसह ११७ धावांची खेळी केली होती. शतकी खेळी करूनही गेलच्या संघाला म्हणजे वेस्ट इंडिजला पराभवाला सामोरं जावं लागलं.
सुरेश रैना
टेस्ट, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात शतक नावावर असणाऱ्या दुर्मीळ यादीत सुरेश रैनाचा समावेश होतो. रैनाने २०१० टी२० वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्रॉस आऊटलेट इथे ६० चेंडूत १०१ धावांची खेळी साकारली. खणखणीत फटकेबाजीचा वस्तुपाठ असं त्या खेळीचं वर्णन करता येईल.
माहेला जयवर्धने
त्याच टी२० वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेच्या माहेला जयवर्धनने झिम्बाब्वेविरुद्ध ६४ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. नजाकत आणि फलंदाजीतलं सौंदर्य यांचा मिलाफ त्या खेळीत पाहायला मिळाला.
ब्रेंडन मॅक्युलम
सध्याच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या प्रशिक्षकपदाची धुरा वाहणारे ब्रेंडन मॅक्युलम यांनी २०१२ वर्ल्डकपमध्ये बांगलादेशविरुद्ध ५८ चेंडूत १२३ धावांची खेळी केली होती.
अलेक्स हेल्स
इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर अलेक्स हेल्सने २०१४ टी२० वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध ६४ चेंडूत नाबाद ११६ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतरही हेल्सचं टी२० कारकीर्द म्हणावी तशी बहरलीच नाही.
अहमद शेहझाद
२०१४ वर्ल्डकपमध्येच पाकिस्तानच्या अहमद शेहझादने बांगलादेशविरुद्ध ६२ चेंडूत नाबाद १११ धावा चोपून काढल्या होत्या.
तमीम इक्बाल
बांगलादेशच्या तमीमने २०१६ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ओमानविरुद्ध ६३ चेंडूत १०३ धावा फटकावल्या होत्या.
ख्रिस गेल
२०१६ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत गेलने इंग्लंडविरुद्ध मुंबईतल्या वानखेडे मैदानावर ४८ चेंडूत १०० धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती.
जोस बटलर
२०२१ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडच्या जोस बटलरने श्रीलंकेविरुद्ध शारजा इथे ६७ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या.
रायली रुसो
२०२२ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसोने बांगलादेशविरुद्ध ५६ चेंडूत १०९ धावा कुटल्या होत्या.
ग्लेन फिलीप्स
न्यूझीलंडचा ३६० ग्लेन फिलीप्सने श्रीलंकेविरुद्ध सिडनी इथे ६४ चेंडूत १०४ धावांची वादळी खेळी केली होती.
पाथुम निसांका
गेले दोन वर्ष तिन्ही प्रकारात सातत्याने धावांची टांकसाळ उघडणाऱ्या पाथुम निसाकांने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिमाखदार शतकी खेळी साकारली. पाथुमने ५२ चेंडूत नाबाद १०० धावा करत श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला. या पराभवासह ऑस्ट्रेलियाचं वर्ल्डकप स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
युवराज सामरा
कॅनडाचा १९वर्षीय युवराज सामरा टी२० वर्ल्डकप स्पर्धेतला सगळ्यात युवा शतकवीर ठरला. युवराजने न्यूझीलंडविरुद्ध चेन्नईत ६५ चेंडूत ११० धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. कॅनडाने सामना गमावला तरी युवराजच्या खेळीचं खूप कौतुक झालं.
साहिबजादा फरहान
या दोघांचा कित्ता गिरवत पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने नामिबियाविरुद्ध ५८ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी साकारली. सुपर८ गटात प्रवेशासाठी पाकिस्तानला या लढतीत विजय अनिवार्य होता. साहिबजादा या विजयाचा शिल्पकार ठरला.

