वनडे आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने नेहमीच पाकिस्तानला हरवले आहे. टीम इंडियाच्या वर्चस्वामुळे भारतीय चाहत्यांनीही आगामी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारत विजय होणार, असा अनुमान लावला आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताचा कप्तान विराट कोहलीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. हा पेच भारतीय खेळाडूंमुळेच उभा राहिला आहे.

विराट संघाच्या प्लेईंग इलेव्हनबाबत संकटात सापडला आहे. विशेषत: इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यानंतर विराटसाठी पाकिस्तानविरुद्ध प्लेईंग इलेव्हन तयार करणे कठीण आव्हान असेल. त्यामुळे आता महेंद्रसिंह धोनीच हा गोंधळ सोडवू शकतो. सलामीपासून मधल्या फळीपर्यंत आणि फिरकी गोलंदाज ते वेगवान गोलंदाजांपैकी सर्वच खेळाडू आपली दावेदारी स्पष्ट करत आहेत. भारताला अजून एक सराव सामना खेळायचा आहे. या सराव सामन्यात विराट अशा खेळाडूंना संधी देईल, ज्यांना पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही.

हेही वाचा – IPL 2022 : मुंबई इंडियन्स ‘या’ खेळाडूंना ठेवणार संघात; हिटमॅन शर्माचा मोठा खुलासा!

ईशान किशन

२३ वर्षीय स्फोटक फलंदाज ईशान किशनने अवघ्या ४६ चेंडूत ७० धावांची धमाकेदार खेळी खेळत प्लेईंग इलेव्हनसाठी आपला दावा केला आहे. त्याने सलामीवीर म्हणून या धावा केल्या. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता विराट त्याला चौथ्या क्रमांकावर संधी देऊ शकतो.

हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्या अष्टपैलू म्हणून किंवा फलंदाज म्हणून संघात असेल की नाही, यावर चर्चा अजून सुरू आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यानंतर हार्दिक गोलंदाजी करणार नाही असे दिसते. २०१९ मध्ये पाठीच्या दुखापतीनंतर हार्दिकच्या फॉर्मवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या तो गोलंदाजी करत नाही.

भुवनेश्वर कुमार

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच विराटने म्हटले आहे, की भुवनेश्वर कुमारचा अनुभव त्याच्यासाठी उपयुक्त ठरेल. पण इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात भुवी महागडा ठरला. त्याने ४ षटकांत ५४ धावा खर्च केल्या. अशा परिस्थितीत, प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याच्या समावेशाबाबत रहस्य कायम आहे.