टी २० वर्ल्डकपपूर्वीच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं १५३ धावांचं आव्हान भारताने दोन गडी गमवून १८ व्या षटकात पूर्ण केलं. आतापर्यंत झालेल्या दोन सराव सामन्यात भारतीय खेळाडू चांगल्या फॉर्मात दिसले. त्यामुळे टी २० वर्ल्डकपमध्ये भारताचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. भारताकडून या सामन्याचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. सराव सामन्यात प्लेईंग इलेव्हनचं बंधन नसल्याने विराट कोहलीने गोलंदाजी केली. भारताने यापूर्वीच्या सराव सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.

भारताचा डाव

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना केएल राहुल आणि रोहित शर्मा या सलामीच्या जोडीने सावध सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी ६८ धावांची भागीदारी केली. केएल राहुल ३१ चेंडूत ३९ धावा केल्या. अगरच्या गोलंदाजीवर वॉर्नर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. केएल राहुल बाद झाल्यानंतर रोहितने सुर्यकुमार यादवसोबत मोर्चा सांभाळला. सराव सामन्यात त्याने ३७ चेंडूत ५२ धावा केल्या. रोहित ६० या धावसंख्येवर असताना रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर मैदानात हार्दिक पंड्या उतरला.

ऑस्ट्रेलियाचा डाव

ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. आर. अश्विनच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्श झटपट बाद झाले. डेविड वॉर्नर पायचीत होत तंबूत परतला. आयपीएलनंतर टी वर्ल्डकपमध्येही डेविड वॉर्नरला सूर गवसताना दिसत नाही.तर मिशेल मार्श आपलं खातंही खोलू शकला नाही. त्यानंतर एरॉन फिंचही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. अवघ्या ८ धावा करून रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. तीन गडी बाद झाल्यानंतर स्टीवन स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल या जोडीनं संघाचा डाव सावरला. चौथ्या गड्यासाठी दोघांनी ५० धावांची भागीदारी केली. दीपक चाहरच्या गोलंदाजीवर ग्लेन मॅक्सवेल ३७ धावांवर त्रिफळाचीत झाला. मार्कस स्टोइनिस आणि स्टीवन स्मिथ जोडीनं संघाची धावसंख्या पुढे नेली. स्टीवन स्मिथने ४८ चेंडूत ५७ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला.

भारतीय संघ: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलिया: डेविड वॉर्नर, एरॉन फिंच, मिशेल मार्श, स्टीवन स्मिथ, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वॅड, एश्टन अगर, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, एडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स