देशात तालिबानचं जुलमी प्रशासन, अस्थिर वातावरण, सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशात खेळायची संधीच नाही असं सगळं असतानाही अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी अल्पावधीत आयपीएल स्पर्धेत ठसा उमटवला आहे. रेफ्युजी कॅम्पमध्ये त्यांनी क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली आहेत. अत्यंत अस्थिर वातावरणात स्पर्धात्मक क्रिकेटची व्यवस्था नसताना, नामांकित प्रशिक्षक तसंच मैदानांची वानवा असताना अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी क्रिकेटचा ध्यास जोपासला. आयसीसीकडून मिळणाऱ्या मदतीचा योग्य उपयोग करत अफगाणिस्तानने क्रिकेटच्या नकाशावर स्वतचं स्थान निर्माण केलं. अफगाणिस्तानचे अनेक क्रिकेटपटू मध्यपूर्वेत म्हणजेच युएईत राहतात. हे सगळे आयपीएलच्या धर्तीवर जगभरात सुरू झालेल्या विविध टी२० लीगमध्ये खेळतात. प्रत्येक देशातल्या खेळपट्ट्या, माणसं, संस्कृती समजून घेत चांगली कामगिरी केली.
अफगाणिस्तानला क्रिकेट नवीन नाही. इतिहासात नजर टाकली तर १८३९मध्ये ब्रिटिश सैन्याने अफगाणिस्तानात क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. मात्र ब्रिटिशांच्या वसाहती असलेल्या अन्य राष्ट्रात क्रिकेट रुजलं तसं अफगाणिस्तानमध्ये झालं नाही. युद्ध,रक्तपात, शस्त्रं,गरिबी, उपासमारी या सगळ्यातून वाचल्यावर रेफ्युजी कॅम्पचा आधार असतो. रोज जिवंत राहण्याची शर्यत असताना क्रिकेटबाबत सूचणं अविश्वसनीय आहे परंतु अफगाणिस्तानने हे करून दाखवलं आहे. देशात युद्धज्वर असताना तसंच तालिबानी राजवटीच्या काळात हजारो अफगाण नागरिकांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला. अनेकांनी सीमेपल्याडच्या रेफ्युजी कॅम्पमध्ये आश्रय घेतला.तेच त्यांचं आयुष्य झालं.
अफगाणिस्तानचे बरेचसे खेळाडू युएईत राहतात. जगभरात होणाऱ्या १० ते १५ टी२० लीगमध्ये नियमितपणे खेळतात. तो अनुभव अफगाणिस्तानसाठी खेळताना तसंच आयपीएलमध्ये त्यांच्या कामी येतो. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी अगदी कमी कालावधीत आयपीएल स्पर्धेत ठसा उमटवला आहे.
रशीद खान अफगाणिस्तानचा प्रतिनिधी
२०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबादने ४ कोटींची बोली लावत रशीद खानला ताफ्यात समाविष्ट केला. आयपीएलमध्ये खेळणारा रशीद पहिलावहिला अफगाण क्रिकेटपटू ठरला. अतिशय झटपट षटक टाकण्यात माहीर रशीदने पहिल्या हंगामापासूनच कर्तृत्वाची झलक दाखवली. रशीदची चार षटकं प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरतात. रशीद धावांना वेसण घालतोच मात्र विकेट्स पटकावण्यात निष्णात आहे. रशीदच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करणं अवघड जातं. सनरायझर्स हैदराबादचा रशीद खान आधारस्तंभ झाला. रशीद हैदराबादसाठी इतकी वर्ष खेळला. चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत हैदराबादने रशीदला रिटेन केलं नाही. नवा संघ गुजरात टायटन्स संघाने रशीदची महती जाणली आणि तब्बल १५ कोटी रुपये खर्चून रशीदला ताफ्यात घेतलं. गुजरातने पदार्पणाच्या हंगामातच जेतेपदावर कब्जा करण्याची किमया साधली. जेतेपदात रशीदचा वाटा सिंहाचा होता. गोलंदाजीच्या बरोबरीने रशीद उत्तम फटकेबाजी करतो. याबरोबरीने नियमित कर्णधाराच्या अनुपस्थितीत रशीद नेतृत्वाची धुराही सांभाळतो. आयपीएल स्पर्धेत दोनच संघांसाठी खेळला असला तरी रशीदच्या नावावर १६३ विकेट्स आहेत. आयपीएलमध्ये अगदी अलीकडे खेळायला लागूनही रशीद सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत रशीद ११व्या स्थानी आहे. रशीदच्या नावावर या स्पर्धेत अर्धशतकी खेळीही आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर टी२० प्रकारात अव्वल गोलंदाजांमध्ये रशीदचं नाव घेतलं जातं. अफगाणिस्तानचं नेतृत्व करणारा रशीद जगभरातल्या २५हून अधिक टी२० संघांसाठी खेळतो.
नूरसाठी चेन्नईने रिती केली तिजोरी
चेन्नई सुपर किंग्स एखाद्या खेळाडूला ताफ्यात घेण्यासाठी प्रचंड पैसा खर्च करण्यावर भर देत नाही. पण अफगाणिस्तानच्या या डावखुऱ्या फिरकीपटूसाठी चेन्नईने पारंपरिक विचारसरणीला छेद दिला. चेन्नईतल्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर उपयुक्त ठरू शकतो हे माहिती असल्याने त्यांनी नूरसाठी १० कोटी रुपये मोजले. २०व्या वर्षी नूरने चेन्नईसारख्या पाच जेतेपदं नावावर असणाऱ्या संघव्यवस्थापनाचा विश्वास कमावला. चेन्नईआधी नूर गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. गुजरातचे सहाय्यक प्रशिक्षक आशिष कपूर हे अफगाणिस्तानच्या युवा संघाचे प्रशिक्षक असताना त्यांनी नूरचं नैपुण्य हेरलं होतं. त्यांच्यामुळेच गुजरात टायटन्सने त्याला संघात घेतलं.
लहान वयात अल्ला गनफझरची मोठी झेप
मुंबई इंडियन्सने विश्वास दाखवलेला फिरकीपटू. कोव्हिड काळात गनफझरने वेगवान गोलंदाजीऐवजी फिरकीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार दावलत अहमदझाईच्या मार्गदर्शनात गनफझर बारकावे शिकला. शापेगीझा लीगमध्ये गनफझर पहिल्यांदा चमकला. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत त्याने ८ विकेट्स घेत प्रभावित केलं. इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत तो मॅन ऑफ द टूर्नामेंट ठरला होता. १६व्या वर्षी त्याने अफगाणिस्तानसाठी पदार्पण केलं. २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुखापतग्रस्त मुजीबऐवजी त्याची निवड केली. मात्र त्याला खेळायची संधी मिळाली नाही. २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सने ४.८ कोटी रुपये खर्चून त्याला संघात घेतलं. मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकला. मुंबईने त्याला रिटेन केलं. यंदाच्या हंगामात गनफझरला अखेर संधी मिळाली. त्याने चांगल्या खेळासह प्रभावित केलं आहे. मुंबई इंडियन्सने आयएलटी२० स्पर्धेतील एमआय एमिरेट्स संघातही त्याला सामील केलं आहे. २०व्या वर्षी गनफझर जगभरातल्या १० विविध टी२० लीग संघांसाठी खेळतो आहे.
अष्टपैलू अझमतुल्ला ओमरझाईची दमदार वाटचाल
आयपीएलमधला नवीन संघ गुजरात टायटन्सने ओमरझाईवर विश्वास ठेवला. मध्यमगती गोलंदाज, जोरदार फटकेबाजी करू शकणारा फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक ही ओमरझाईची ओळख. गुजरातसाठी खेळताना ओमरझाईला मर्यादित संधी मिळाल्या. २०२४ टी२० वर्ल्डकप स्पर्धेत चांगल्या कामगिरीचा परिणाम म्हणून पंजाब किंग्ज संघाने २.४० कोटी रुपये खर्चून त्याला संघात घेतलं. गेल्या वर्षी संघ समीकरणांमुळे ओमरझाईला फारशा संधी मिळाल्या नाहीत. पंजाबने त्याला रिटेन करत विश्वास दाखवला आहे. यंदाच्या हंगामात अद्याप तरी त्याला संधी मिळालेली नाही.
पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणारा धैर्यवान मुजीब
पॉवरप्लेच्या षटकांमध्ये ३० गज वर्तुळाच्या बाहेर दोनच खेळाडू असतात. त्यामुळे सुरुवातीच्या सहा षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा लुटण्याचा फलंदाजांचा प्रयत्न असतो. बचावासाठी सीमारेषेनजीक केवळ दोन क्षेत्ररक्षक असताना गोलंदाजी करण्यासाठी धैर्य लागतं. हे धैर्य दाखवलं होतं मुजीब उर रहमानने. पंजाब किंग्ज संघाने मुजीबच्या फिरकीवर विश्वास ठेवत त्याला संघात घेतलं.
प्रेसिडेंट मोहम्मद नबी
अफगाणिस्तान क्रिकेटचा मूळपुरुष असं मोहम्मद नबीचं वर्णन केलं जातं. प्रेसिडेंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या नबीने अष्टपैलू खेळाच्या बळावर आयपीएलमध्ये ठसा उमटवली. आयपीएल लिलावात विक्री होणारा नबी अफगाणिस्तानचा खेळाडू ठरला. हैदराबाद, कोलकाता, मुंबई असा नबीचा आयपीएल प्रवास झाला आहे. दांडपट्टा स्टाईल फटकेबाजीची शैली, छोट्याशा रनअपसह फिरकी गोलंदादी आणि उत्तम क्षेत्ररक्षण ही नबीची ओळख होती.
गुरबाझची फटकेबाजी
जगभरातलील विविध लीग आणि अफगाणिस्तान संघासाठी दमदार प्रदर्शन करणाऱ्या रहमनुल्ला गुरबाझला गुजरात टायटन्सने संघात सामील केलं. मात्र अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकत असल्याने गुरबाझला संधी मिळाली नाही. यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने गुरबाझला संघात घेतलं.
वादग्रस्त नवीन पण खेळ दर्जेदार
अत्यंत कमी कालावधीत सर्वाधिक चर्चा झालेला अफगाणिस्तानचा खेळाडू. २०२३ हंगामात लखनौ सुपरजायंट्सकडून खेळणाऱ्या नवीनची, विराट कोहलीबरोबर बाचाबाची झाली. याची परिणती विराट आणि लखनौचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील वादात झाली. नवीनने त्यानंतर आरसीबीच्या मुंबईविरुद्ध पराभवानंतर खोचक ट्वीट केलं. भारतीय चाहत्यांनी नवीनला लक्ष्य केलं. अफगाणिस्तानच्या सामन्यांदरम्यानही नवीनला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. भारत-अफगाणिस्तान सामन्यादरम्यान कोहली आणि नवीन यांनी हँडशेक करून वादावर पडदा पाडला. या प्रकरणामुळे नवीनची गोलंदाजी मागे पडली. लखनौ संघाकडून खेळताना नवीनने उत्तम कामगिरी केली.
डावखुऱ्या फझलक फरुकीची चमक
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना आयपीएल स्पर्धेत नेहमीच मोठी मागणी असते. २०२२ लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने ५० लाख रुपये मोजून त्याला संघात घेतलं. दोन हंगामात फरुकीने हैदराबादसाठी नवा चेंडू हाताळला. हाणामारीच्या षटकांमध्ये गोलंदाजी केली. मोठ्या फलंदाजांना बाद करण्यात फरुकीची हातोटी आहे. २०२५ लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने २ कोटी रुपये मोजून त्याला संघात घेतलं. त्याला फार संधी मिळाल्या नाहीत, हंगामानंतर त्यांनी त्याला रिलीज केलं.
पोस्टर बॉय गुलबदीन नईब
अफगाणिस्तानचा पोस्टर बॉय गुलबदीन नईब हा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. कारकिर्दीच्या उत्तरार्धात गुलबदीनला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.
