घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभारूनही अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागलेल्या महाराष्ट्रासमोर आता तामिळनाडूचे आव्हान असणार आहे. ओडिशाविरुद्धच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने तामिळनाडूला दोन गुणांवर समाधान मानावे लागले होते तर दुसऱ्या लढतीत कर्नाटकने त्यांच्यावर मात केली होती. निर्विवाद गुण मिळवण्याचे दोन्ही संघांचे उद्दिष्ट आहे. मुरली विजयच्या समावेशामुळे तामिळनाडूची फलंदाजी बळकट झाली आहे. अभिनव मुकुंद, एस.बद्रीनाथ आणि युवा बाबा अपराजित यांच्यावर फलंदाजीची भिस्त आहे. त्रिशतकवीर केदार जाधवकडून महाराष्ट्राला मोठय़ा अपेक्षा आहेत. हर्षद खडीवाले, रोहित मोटवानी आणि अंकित बावणे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. लक्ष्मीपती बालाजीकडे तामिळनाडूच्या गोलंदाजीचे नेतृत्त्व आहे. त्याच्या साथीला यो महेश, जगन्नाथन कौशिक आणि राजू औशिक श्रीनिवास अशी फळी आहे. महाराष्ट्रासाठी अक्षय दरेकरची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.