आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश संघाला भारतात पाठवायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेताना केवळ लोकांच्या भावनांचा विचार करणे योग्य ठरणार नाही. त्याचे परिणाम पुढील १० वर्षांपर्यंत भोगावे लागू शकतील. त्यामुळे कोणताही भावनिक निर्णय घेणे टाळा, असा सल्ला माजी कर्णधार तमिम इक्बालने बांगलादेश क्रिकेट मंडळाला (बीसीबी) दिला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूचनेनंतर ‘आयपीएल’ संघ कोलकाता नाइट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला संघमुक्त केले. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढत असल्याने काही राजकीय पक्षांनी दडपण आणल्यामुळे ‘बीसीसीआय’ने असे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, बांगलादेशातील हंगामी सरकार आणि ‘बीसीबी’ने आक्रमक भूमिका घेताना, आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठविण्यास नकार दिला. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत बांगलादेश संघाचे तीन सामने कोलकाता, तर एक सामना मुंबई येथे नियोजित आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे सामने श्रीलंकेत हलविण्याची ‘बीसीबी’ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) विनंती केली. मात्र, ती अमान्य करण्यात आली. त्यानंतर ‘बीसीबी’ने ‘आयसीसी’ला पुन्हा पत्र लिहिले आहे. परंतु कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करण्याचे तमिमने ‘बीसीबी’ला आवाहन केले आहे.
‘‘सध्याची परिस्थिती जरा संवेदनशील आहे. त्यामुळे तत्काळ प्रतिक्रिया देणे थोडे अवघड आहे. मात्र, अनेक प्रश्न संवादातून सोडवता येतात, हे लक्षात ठेवायला हवे,” असे तमिमने एका क्रिकेट संकेतस्थळाला सांगितले. “जागतिक क्रिकेटमध्ये बांगलादेशचे स्थान काय आणि आपल्या क्रिकेटचे भविष्य काय असू शकते, हे पाहून निर्णय घ्यायला हवेत,” असेही त्याने नमूद केले.
बांगलादेश क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नझरुल यांनी राष्ट्रीय स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करत आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारमध्ये भारतविरोधी भावना वाढत असल्याचे संकेत आहेत. ‘बीसीबी’नेही बहुतांश वेळा या भूमिकेला दुजोरा दिला असला, तरी अमिनुल इस्लाम बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील ‘बीसीबी’ पूर्णपणे एकमताने या दृष्टिकोनाशी सहमत नाही, अशी चर्चा आहे.
“बीसीबी ही स्वतंत्र संस्था आहे, असे आपण मानत असू, तर तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार असायलाच हवा. सरकारची भूमिका महत्त्वाची आहे आणि चर्चा आवश्यकही आहे. मात्र, क्रिकेट मंडळाला जे योग्य वाटते, तो निर्णय त्याने घ्यायला हवा. लोकांचे मत नेहमीच बदलत असते. सामन्यांच्या वेळी प्रेक्षक भावनेतून अनेक गोष्टी बोलतात. केवळ त्याचा विचार करून निर्णय घ्यायला लागलात, तर इतकी मोठी संस्था चालवणे शक्य नाही,” असेही तमिमने नमूद केले.
‘‘तुम्ही आज जो निर्णय घ्याल, त्याचे परिणाम तुम्हाला पुढील १० वर्षांपर्यंत भोगावे लागू शकतील हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून, बांगलादेश क्रिकेट आणि बांगलादेशच्या खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे माझे वैयक्तिक मत आहे,’’ असेही तमिमने शेवटी सांगितले.
दररोज ‘बोलंदाजी’ कशासाठी?
बांगलादेशकडून ७० कसोटी, २४३ एकदिवसीय आणि ७८ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या ३६ वर्षीय तमिमने ‘बीसीबी’ आणि सरकारकडून येणाऱ्या रोजच्या निवेदनांवरही टीका केली. “अंतर्गत चर्चा पूर्ण करून अंतिम निर्णय झाल्यानंतरच निवेदन द्यायला हवे. प्रत्येक टप्प्यावर जाहीर विधाने केल्यास अनावश्यक अनिश्चितता निर्माण होते,” असे तमिम म्हणाला. “उद्या किंवा आठवड्यानंतर निर्णय बदलला, तर आधीच्या विधानांचे स्पष्टीकरण कसे देणार?” असा सवालही त्याने उपस्थित केला.
