तनुष कोटियनच्या फिरकीसमोर हरयाणाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि मुंबईने शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसी इथे चाललेल्या लढतीत १० विकेट्सने विजय मिळवला. ४२ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईने यंदाच्या हंगामातला सलग तिसरा थेट विजय मिळवला.
मुंबईने अंगक्रिश रघुवंशी (११४) आणि मुशीर खान (१०९) यांच्या शतकांच्या बळावर ४३० धावांची मजल मारली. तनुष कोटियनने नाबाद ५२ धावांची खेळी केली. हरयाणातर्फे समंत जाखरने ३ तर अमन कुमार आणि पार्थ वत्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
हरयाणाने निशांत सिंधूच्या शतकाच्या जोरावर २७० धावा केल्या. निशांतने ८ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १०५ धावांची खेळी केली. शतकी खेळी करणाऱ्या मुशीरने गोलंदाजीतही चमक दाखवत ६ विकेट्स पटकावल्या.
मुंबईने हरयाणाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात मुशीरच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकणाऱ्या हरयाणाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात तनुषच्या फिरकीसमोर लोटांगण घातलं. तनुषने ८१ धावांच्या मोबदल्यात तब्बल ८ विकेट्स पटकावल्या. तनुषने पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या होत्या. तनुषने ५०व्या फर्स्टक्लास सामन्यात पहिल्यांदाच सामन्यात १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची करामत केली. हरयाणातर्फे हिमांशू राणाने सर्वाधिक ४६ धावा केल्या. हरयाणाचा दुसरा डाव २५६ धावांतच आटोपला. मुंबईला विजयासाठी ९७ धावांचं लक्ष्य मिळालं.
अंगक्रिश रघुवंशी नाबाद ६७ आणि दिव्यांश सक्सेना नाबाद ३० यांच्या आश्वासक खेळींच्या आधारे मुंबईने १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. शतक आणि ८ विकेट्स पटकावणाऱ्या मुशीर खानला सामनावीर पुरस्कराने गौरवण्यात आलं.
मुंबईची पुढची लढत ब्रेबॉर्न स्टेडियम इथे रेल्वेविरुद्ध २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
