Tanzid Hasan Tamim Scores Historic Test Century in Australia: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये डार्विन येथे पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. बांगलादेश संघाने पहिल्या कसोटीत आपला दबदबा कायम राखला आहे. बांगलादेशने कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर सर्वबाद केलं आणि दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट फलंदाजी करत पहिल्या डावात आघाडी मिळवली आहे. यादरम्यान बांगलादेशचा फलंदाज तन्झिद हसन तामिम याने शतक झळकावत इतिहास घडवला.
फक्त दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या तन्झिदने संयमाने डाव उभारला. सुरुवातीला सावध फलंदाजी केल्यानंतर त्याने हळूहळू गती वाढवत बांगलादेशला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली. डावखुऱ्या तन्झिदला कर्णधार नजमुल हुसेन शांतोची चांगली साथ मिळाली.
बांगलादेशचा सलामीवीर तानझिद हसन तमीम याने इतिहास रचत ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा पहिला बांगलादेशी फलंदाज होण्याचा मान मिळवला. डार्विन येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने १८८ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. २५ वर्षीय तानझिदची ही ऐतिहासिक खेळी अशा वेळी आली, जेव्हा बांगलादेशच्या गोलंदाजांनी यजमान संघाला अवघ्या १९८ धावांवर गुंडाळत शानदार सुरुवात करून दिली होती.
तन्झिदने याच डावात आधी आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि संयमाने फलंदाजी करत अखेर शतकाचा टप्पाही गाठला. त्याच्या या खेळीमुळे त्याने ऑस्ट्रेलियात कसोटीत बांगलादेशी फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम हन्नान सरकार याच्या नावावर होता, ज्याने २००३ मध्ये ७६ धावा केल्या होत्या.
या शतकामुळे बांगलादेशसाठी हा कसोटी सामना आणखी संस्मरणीय ठरला आहे. याआधी हसन महमूद याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा कणा मोडत ६ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या गोलंदाजीमुळे स्टार खेळाडूंनी भरलेला ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १९८ धावांत गारद झाला आणि पाहुण्या बांगलादेशने सामन्यावर पकड मिळवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं.
तन्झिदचा ऐतिहासिक पराक्रम
बांगलादेशच्या तानझिदच्या शतकाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर नवा इतिहास घडवला. हन्नान सरकारच्या २००३ मधील कॅर्न्स येथे केलेल्या ७६ धावा दोन दशकांहून अधिक काळ सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या म्हणून कायम होती. अवघ्या आपल्या दुसऱ्या कसोटीत तन्झिदने हा विक्रम मागे टाकला. त्याचा हा पराक्रम अधिक खास ठरतो, कारण त्याने ही खेळी पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांसारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध साकारली.
दरम्यान, तन्झिद आणि मोमिनुल हक यांनी दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. मोमिनुल ४९ धावांवर हेझलवूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला, पण तोपर्यंत बांगलादेशने सामन्यात मजबूत स्थिती निर्माण केली होती. त्यानंतर आलेल्या नजमुल हसन शांतोने त्याला चांगली साथ देत डाव साकारला. यानंतर शतकी खेळी केल्यानंतर तन्झिद झेलबाद झाला. तन्झिदने १९७ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह १०१ धावांची खेळी केली.
