मुंबई : भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि सुना असा परिवार आहे.
गुणवान कबड्डीपटू घडविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आल्हाद सेवा मंडळातून प्रवास सुरू करणार्या तारक यांनी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील मैदाने आपल्या कामगिरीने गाजवली. व्यावसायिक गटातून त्यांनी रिझर्व्ह बॅक आणि महिंद्रा-महिंद्रा संघांचेही प्रतिनिधित्व केले.
मुंबई आणि महाराष्ट्राकडून एकाच वेळी १९७४ मध्ये तारक यांची संघात निवड झाली. राज्यासह बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्वही केले. सुरेख पदलालित्याच्या जोरावर त्यांनी चढाईतील हुकमी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला होता. दोन्ही बाजूने चढाई करण्यात ते तरबेज होते. तसेच बचावात साहाय्यक म्हणूनही ते कोणत्याही स्थानावर सहजपणे खेळायचे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या पुरुष, तसेच महिला संघाचे प्रशिक्षकपदही भूषविले. पाच वर्षे ते मुंबई शहक कबड्डी संघाचे कार्यकारी सदस्य राहिले.
तारक यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी दादर येथील चैत्यभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार सुशील शिंदे, आमदार महेश सावंत, अर्जुन पुरस्कार विजेते माया मेहेर, अशोक शिंदे, राजू भावसार यांच्यासह शैला रायकर, ग्रेटा डिसुझा, जेम्स परेरा, जया शेट्टी, संघटक मीनानाथ धानजी तसेच अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
