Taskin Ahmed Celebration Video: बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियातील टीआयओ स्टेडियम मरारा येथे सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय सुरुवातीलाच फसला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच मोठे धक्के देऊन बांगलादेशला दमदार सुरुवात करुन दिली. यादरम्यान तस्किन अहमदने कॅमरुन ग्रीनला बाद केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीक्रमात एकापेक्षा एक स्टार फलंदाज आहेत. पण बांगलादेशच्या गोलंदाजांनीही दमदार गोलंदाजी केली. यादरम्यान तस्किन अहमदने २२ व्या षटकात ग्रीनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावातील फलंदाजी सुरु असताना तस्किन अहमद २२ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्यावेळी बांगलादेशचा सर्वात अनुभवी खेळाडू मुश्फिकुर रहिम हा मिड विकेटला क्षेत्ररक्षणासाठी तैनात होता. तस्किनने ओव्हर द विकेटचा मारा करत ग्रीनच्या पॅड लाईनवर चेंडू टाकला. हा चेंडू ग्रीनने मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने ढकलला. पण मुश्फिकुर रहिमने डाईव्ह मारुन सोपा झेल घेतला. विकेट घेतल्यानंतर तस्किन हटके स्टाईलने डान्स करताना दिसून आला. याआधी तो आपल्या नागिण डान्स सेलिब्रेशनमुळे तुफान चर्चेत आला होता. आता या सेलिब्रेशनचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना हा निर्णय सार्थ ठरवता आलेला नाही. सलामीला आलेला ट्रॅव्हिस हेड अवघ्या २२ धावांवर माघारी परतला. तर जेक वेदरार्ल्ड २३ धावा करुन माघारी परतला. मार्नस लाबुशेनने १ धाव करुन पॅव्हेलियनची वाट धरली. तर कॅमेरुन ग्रीनला अवघ्या ११ धावा करता आल्या. अॅलेक्स कॅरी १९, तर ब्यू वेब्स्टर ११ आणि कर्णधार पॅट कमिन्स अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला. स्टीव्ह स्मिथने एक बाजू धरुन ठेवली आणि आपंल अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळू शकली नाही.

बांगलादेशच्या गोलंदाजांची दमदार गोलंदाजी

बांगलादेशच्या गोलंदाजांना बांगलादेशमध्ये खेळण्याचा फारसा अनुभव नाही. पण, तरीदेखील या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. अनुभवी गोलंदाज तस्किन अहमदने आतापर्यं १४ षटकांत ४६ धावा खर्च करुन २ गडी बाद केले आहेत. तर हसन महमूदने १३ षटकात ४९ धावा खर्च करुन ३ गडी बाद केले आहेत. तर इबादत होसेनने १० षटकांत ३२ धावा खर्च करुन २ गडी बाद केले आहेत.