विक अॅन झी (हॉलंड) : भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीने टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत निल्स ग्रँडेलियसवर विजयाची नोंद केली. आर. प्रज्ञानंदला मात्र सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला.
१६ वर्षीय प्रज्ञानंदवर आठव्या फेरीत अझरबैजानचा अनुभवी खेळाडू शख्रियार मामेदेरोव्हने मात केली. त्यामुळे आठ फेऱ्यांअंती प्रज्ञानंदच्या खात्यावर २.५ गुण आहेत. या सामन्यातील विजेत्या मामेदेरोव्हने कार्लसनसह (५.५ गुण) संयुक्तरीत्या अग्रस्थान पटकावले.
विदित आणि हॉलंडचा अनिश गिरी प्रत्येकी पाच गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आहेत. आठव्या फेरीत स्वीडनच्या ग्रँडेलियसने ३४व्या चालीत चूक केली आणि विदितने दर्जेदार खेळ सुरू ठेवत विजय मिळवला. चॅलेंजर विभागात भारताच्या अर्जुन इरिगेसीने (७ गुण) आठव्या फेरीत जोनस बिएरेवर मात करताना अग्रस्थानावरील पकड मजबूत केली.