एपी, न्यू यॉर्कपुरुष गटात अमेरिकेच्या १२व्या मानांकित टेलर फ्रिट्झ आणि २०व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. तर, महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत एमा नवारो आणि अरिना सबालेन्का एकमेकांसमोर असतील. फ्रिट्झने उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचा २०२० मधील उपविजेता जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवला ७-६ (७-२), ३-६, ६-४, ७-६ (७-३) असे पराभूत केले. चौथ्या मानांकित झ्वेरेवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, त्याला चमक दाखवता आली नाही. पहिला सेट फ्रिट्झने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये विजय नोंदवत झ्वेरेवने सामना बरोबरीत आणला. यानंतर फ्रिट्झने सलग दोन सेटमध्ये विजय मिळवताना झ्वेरेवला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात टियाफोने तीन वर्षांत दुसऱ्यांदा स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ग्रिगोर दिमित्रोवने उपांत्यपूर्व सामन्याच्या चौथ्या सेटमध्ये सामन्यातून माघार घेतल्याने टियाफोला पुढे चाल मिळाली. दिमित्रोवने माघार घेतली तेव्हा टियाफो ६-३, ६-७ (५-७), ६-३, ४-१ असा आघाडीवर होता. हेही वाचा >>>Duleep Trophy 2024 Live Streaming: दुलीप ट्रॉफीचे सामने लाईव्ह कुठे पाहता येणार? संघ, वेळापत्रक आणि सर्व डिटेल्स वाचा एकाच क्लिकवर महिला गटात १३व्या मानांकित अमेरिकेच्या नवारोने स्पेनच्या पॉला बडोसावर ६-२, ७-५ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. नवारोने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. गेल्या सामन्यात तिने गतविजेत्या कोको गॉफला पराभूत केले होते. नवारोने पहिला सेट जिंकत आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिला बडोसाकडून आव्हान मिळाले. मात्र, निर्णायक कामगिरी करत तिने विजय नोंदवला. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात सबालेन्काने सातव्या मानांकित चीनच्या किनवेन झेंगला ६-१, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवले. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती सबालेन्काचा प्रयत्न वर्षातील दुसरा व एकूण तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचा असेल. बोपण्णा सुतजियादी जोडीचे आव्हान संपुष्टात भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियाची साथीदार अल्दिला सुतजियादी जोडीला मिश्र दुहेरीत डोनाल्ड यंग व टेलर टाऊनसेंड या अमेरिकन जोडीकडून उपांत्य सामन्यात ३-६, ४-६ असे पराभूत व्हावे लागले. यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारत व इंडोनेशियाच्या जोडीने एक तास, ३० मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मॅथ्यू एब्डेन व चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवा जोडीला पराभूत केले होते. यापूर्वी बोपण्णाचे पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले होते.