न्यूझीलंड-बांगलादेश कसोटी मालिका

रॉस टेलरने केलेल्या द्विशतकी खेळीनंतर बांगलादेशचे तीन बळी झटपट बाददेखील झाल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय न्यूझीलंडच्या दृष्टिपथात आला आहे. मात्र पावसाचा फटका बसलेल्या या सामन्याच्या अखेरच्या दिवशी खेळ पुन्हा कितपत खेळला जातो, त्यावर सामन्याचा निकाल निश्चित होणार आहे.

बांगलादेशचा पहिला डाव २११ धावांमध्ये संपुष्टात आल्यानंतर न्यूझीलंडचे प्रारंभीचे दोन गडी ३८ धावांमध्येच तंबूत परतले होते. त्यानंतर सोमवारच्या चौथ्या दिवशी फलंदाजीस उतरलेल्या टेलरला बांगलादेश संघाने २० धावसंख्येवर दोन वेळा झेल सोडून जीवदान दिले. त्याचा पुरेपूर फायदा उठवत टेलरने २१२ चेंडूंमध्ये २०० धावा फटकावल्या. हेन्री निकोल्सने १०७ धावांची शतकी खेळी करीत टेलरला तोलामोलाची साथ दिली, तर कर्णधार केन विल्यम्सननेदेखील ७४ धावांची उपयुक्त खेळी करीत संघाला चारशेच्या पल्याड पोहोचवले. न्यूझीलंडने त्यांचा डाव ६ बाद ४३२ धावांवर घोषित केला. त्यानंतर चौथ्या दिवसाची २३ षटके बाकी असताना बांगलादेशचा संघ पुन्हा फलंदाजीस मैदानावर उतरला. मात्र पहिल्याच षटकात बांगलादेशच्या तमिम इक्बालला तंबूत परतावे लागल्याने त्यांना जोरदार झटका बसला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा बांगलादेश ३ बाद ८० धावांवर खेळत आहे. अद्यापही बांगलादेश १४१ धावांनी पिछाडीवर आहे.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : पहिला डाव सर्व बाद २११ (तमिम इक्बाल ७४, लिटन दास ३३, नील वॅग्नर ४/२८);  दुसरा डाव ३ बाद ८०

न्यूझीलंड : पहिला डाव ६ बाद ४३२ (रॉस टेलर २००, हेन्री निकोल्स १०७; शादमान इस्लाम ४/४४).