Team India Schedule on 17th June: भारतीय क्रिकेट संघ यंदा एकाचवेळी विविध दौऱ्यांवर आहे. भारताचा वरिष्ठ पुरूष संघ घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरूद्ध वनडे मालिका खेळत आहे, तर भारत अ संघ श्रीलंका अफगाणिस्तानविरूद्ध तिरंगी मालिका श्रीलंकेत खेळत आहे. याशिवाय भारताला महिला वरिष्ठ संघ टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हे तिन्ही संघ उद्या म्हणजेच १७ जून रोजी सामने खेळणार आहे, हे सामने कधी कुठे आणि किती वाजता होणार हे जाणून घेऊया.
बुधवार, १७ जून रोजी भारतीय संघाचे ३ सामने होणार आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्रिकेटचा भरपूर थरार अनुभवता येईल. त्यामुळे, सर्व सामन्यांच्या वेळा नक्कीच नोंदवून ठेवा, जेणेकरून कोणताही सामना पाहण्यापासून हुकणार नाही. शिवाय हे सर्व सामने कुठे पाहता येणार, हेदेखील जाणून घेऊया.
भारत अ संघाचा तिरंगी मालिकेतील सामना किती वाजता?
तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील भारत अ संघ सध्या तिरंगी मालिकेसाठी श्रीलंकेत आहे. या मालिकेतील भारताचा अखेरचा साखळी सामना बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. तिसऱ्या सामन्यात भारताचा पुन्हा एकदा श्रीलंकेशी सामना झाला; ५० षटकांचा हा सामना बरोबरीत सुटला, मात्र त्यानंतर झालेल्या ‘सुपर ओव्हर’मध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
आता, जर संघाला या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात खेळायचं असेल, तर त्यांना अफगाणिस्तानचा पराभव करावा लागेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सुरू होईल. हा ५० षटकांचा एकदिवसीय सामना असल्याने, तो संध्याकाळी ६:०० च्या सुमारास संपण्याची शक्यता आहे. हा सामना सोनी लिव्ह अॅप आणि टीव्ही चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार आहे.
भारत-अफगाणिस्तान दुसरा वनडे सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि अफगाणिस्तान वरिष्ठ संघांमध्ये वनडे मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे; पहिल्या सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. दुसरा सामना १७ जूनला दुपारी १.३० वाजता सुरू होणार आहे. शिवाय हा सामना जिओ हॉटस्टार अॅप आणि स्टार स्पोर्ट्स या चॅनेलवर लाईव्ह पाहता येईल.
भारत महिला संघाचा नेदरलँड्सविरूद्ध टी-२० वर्ल्डकप सामना कधी होणार?
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ खेळत आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताने विजयाने स्पर्धेला सुूरूवात केली. आता भारताचा गट टप्प्यातील दुसरा सामना नेदरलँड्स संघाविरूद्ध होणार असून हा सामना संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल.
