Team India Squad For England Tour In Absence Of Virat Kohli- Rohit Sharma: भारतीय संघ येत्या काही दिवसात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताची पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय आगामी हंगामाला दमदार सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केलं. आता विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
शुबमन गिलला मिळू शकते कर्णधारपदाची जबाबदारी
भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २० जून पासून सुरूवात होणार आहे. रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता बीसीसीआयने नव्या कर्णधाराचा शोध घ्यायला सुरूवात केली. माध्यमातील वृत्तानुसार, शुबमन गिलची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड केली जाणार आहे.
या दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विनसारखे अनुभवी खेळाडू नसणार आहेत. मात्र, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजासारखे अनुभवी खेळाडू संघात असणार आहेत. यासह वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते.
रोहितच्या अनुपस्थितीत कोण करणार डावाची सुरूवात?
गेली काही वर्ष रोहित शर्मा डावाची सुरूवात करत होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने डावाची सुरूवात केली होती. आता रोहितनंतर ही जोडी पुन्हा एकदा डावाची सुरूवात करू शकते. तर शुबमन गिल ,ऋषभ पंतसारखे अनुभवी खेळाडू वरच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.
शेवटी ध्रुव जुरेल आणि सरफराज खानसारखे नवखे खेळाडू आहेत, जे जबाबदारी घेऊन खेळू शकतात. यासह करूण नायरला देखील भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याने याआधीही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तर दुसरीकडे मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर देखील पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याची जागा भरून काढणं हे देखील बीसीसीआयसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळता दिसेल. त्याला वॉशिंग्टन सुंदरची जोड मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीला संघात स्थान दिले जाऊ शकते.