India vs Afghanistan 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि दिलेलं आव्हान १४.५ षटकांत पूर्ण करत ७ गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाचा दमदार विजय

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी दमदार सुरूवात करून दिली. गेल्या सामन्यात संजू सॅमसन फ्लॉप राहिला होता. पण या डावात फलंदाजी करताना त्याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने २२ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ५७ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने १९ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ३९ धावांची खेळी केली.

अफगाणिस्तानने केल्या १५९ धावा

या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला हवी तशी सुरूवात करता आली नाही. सलामीला आलेला रहमानुल्लाह गुरबाज शून्यावर माघारी परतला.इब्राहिम जादरानने ३७ धावांची खेळी केली. तर सेदिकुल्लाह अटलने १२ धावा केल्या. गुलबदीन नईबने १० आणि डार्विश रसूलीने २६ धावांची खेळी केली. शेवटी मोहम्मद नबीने २० आणि राशिद खानने झटपट धावा करून संघाची धावसंख्या १५० पार पोहोचवली. अफगाणिस्तानने २० षटकांअखेर ८ गडी बाद १५९ धावा केल्या.

तिसरा सामना कधी?

मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता. आता दुसरा सामना ७ गडी राखून जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका ३-० ने आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर अफगाणिस्तानचा संघ आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.