India vs Zimbabwe Highlights: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये अजिंक्य राहिल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग खडतर झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग सोपा झाला. आता झिम्बाब्वेला पराभूत करून भारतीय संघाने सेमीफायनलच्या दिशेने मजबूत पाऊल टाकलं आहे. चेन्नईत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी २५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ७२ धावांनी आपल्या नावावर केला.
झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी २५७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ब्रायन बेनेटने ९७ धावांची दमदार खेळी केली. मरूमानीने २० धावांचे योगदान दिले. डियॉन मेयर्स अवघ्या ६ धावा करून माघारी परतला. कर्णधार सिकंदर रझाने जोर लावला. पण तो अवघ्या ३१ धावा करून माघारी परतला. रायन बर्ल शून्यावर माघारी परतला.
भारतीय संघाने उभारला २५६ धावांचा डोंगर
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये मोठा बदल करण्यात आला होता. अभिषेकसोबत संजूने डावाची सुरूवात केली. तर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या जोडीने मिळून पहिल्या विकेटसाठी ४८ धावा जोडल्या. संजू सॅमसनने २४ धावा केल्या. तर अभिषेक शर्माने ५५ धावांची खेळी केली. इशान किशनने ३८ धावांचे योगदान दिले. कर्णधार सूर्यकुमार यादवने ३३ धावा केल्या. तर शेवटी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या २५० पार पोहोचवली. हार्दिक पांड्या ५० धावांवर नाबाद राहिला. तर तिलक वर्माने नाबाद ४४ धावांची खेळी केली.
वेस्ट इंडिजविरूद्ध निर्णायक लढत
दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने झिम्बाब्वेविरूद्ध मोठ्या विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी कायम आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील पुढील सामना वेस्ट इंडिजविरूद्ध होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी नॉकआऊट सामना असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल, तो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हा सामना रविवारी १ मार्चला खेळवला जाणार आहे. या सामन्यात नेट रनरेट महत्वाचा नसेल, केवळ सामना जिंकून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करू शकतो.

