India VS New Zealand, Ahmedabad Narendra Modi Stadium: भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. हा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघ दमदार फॉर्ममध्ये आहे. पण अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतासाठी आतापर्यंत अनलकी राहिलं आहे. याआधी आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना याच मैदानावर खेळवला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सुपर ८ फेरीतील सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागला होता. आता फायनलआधी भारतीय संघाने मोठा निर्णय घेतला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाने फायनलआधी हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आतापर्यंतचा नकारात्मक इतिहास पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे. २०२३ मध्ये झालेल्या फायनलमध्ये भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला आहे. हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण काय? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. भारताने आयसीसी स्पर्धेतील २ महत्वाचे सामने याच मैदानावर गमावले आहेत. २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील पहिला सामना याच मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी भारतीय संघ कोणतीच रिस्क घेणार नाही. त्यामुळे हा हॉटेल बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा रंगली आहे.

या मैदानावर भारतीय संघाने १० टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ७ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाला २ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यापैकी एक सामना गमावला आहे. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे.