Team India Most Sixes In T20I Cricket Record: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघ २४८ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण भारतीय संघाला २२३ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना २४ धावांनी गमावला. पण टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २००० षटकार खेचणारा जगातील दुसरा तर आशियातील पहिलाच संघ ठरला आहे.
वेस्ट इंडिजचा संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० षटकार खेचणारा जगातील पहिलाच संघ आहे. आता या रेकॉर्डमध्ये भारतीय संघाचं नाव देखील जोडलं गेलं आहे. अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. मुख्य बाब म्हणजे हे दोन्ही रेकॉर्ड याच मालिकेदरम्यान बनवले गेले आहेत. वेस्ट इंडिजने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान २००० षटकारांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर पुढच्याच सामन्यात भारतीय संघाने २००० षटकारांचा पल्ला गाठला आहे. वेस्ट इंडिजच्या नावे सर्वाधिक २०२६ षटकार खेचण्याची नोंद आहे. तर भारतीय संघाने आतापर्यंत २०१० षटकार खेचले आहेत.
वेस्ट इंडिज आणि भारत या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. तर न्यूझीलंडचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत १५८५ षटकार खेचले आहेत. तर या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या पाकिस्तानने आतापर्यंत १५०७ षटकार खेचले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ या यादीत पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानने आतापर्यंत १४०७ षटकार खेचले आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारे संघ:
वेस्ट इंडिज- २०२६ षटकार
भारत- २०१० षटकार
न्यूझीलंड- १५८५ षटकार
पाकिस्तान- १५०७ षटकार
दक्षिण आफ्रिका- १४०७ षटकार
भारतीय संघाचा पराभव
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून शे होपने नाबाद शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर २४७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून संजू सॅमसनने दमदार अर्धशतकी खेळी केली. पण भारतीय संघाला २२३ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना २४ धावांनी गमावला.
