Team India Record: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही संघांमधील एकमेव कसोटी सामन्याचा थरार मुल्लानपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला. सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी मोलाचं योगदान दिलं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी २० विकेट्स घेऊन भारताला हा सामना जिंकून दिला. या सामन्याचा निकाल तिसऱ्याच दिवशी लागला. भारताने हा सामना १ डाव आणि ३०० धावांनी जिंकून मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ८ गडी बाद ५६४ धावा केल्या. सलामीला आलेला यशस्वी जैस्वाल अवघ्या २४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर केएल राहुल आणि साई सुदर्शनने मिळून डाव सांभाळला. केएल राहुलने १०० धावा केल्या. तर साई सुदर्शनने ८१ धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिलने १२६ धावांची खेळी केली. ऋषभ पंतने ८१ धावांची खेळी केली. शेवटी ध्रुव जुरेलने १९ आणि वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावांची खेळी केली.
या धावांचा पाठलाग करण्यसाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून रहमत शाहने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. या डावात भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना पहिलाच सामना खेळत असलेल्या मानव सुथारने सर्वाधिक ६ गडी बाद केले. अफगाणिस्तानचा पहिला डाव अवघ्या १५२ धावांवर आटोपला. त्यामुळे शुबमन गिलने अफगाणिस्तानला फॉलो ऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ तर कुलदीप यादवने ३, मानव सुथारने १ आणि मोहम्मद सिराजने १ गडी बाद केला. अफगाणिस्तानचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १ डाव आणि ३०० धावांनी आपल्या नावावर केला.
भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय
भारत विरूद्ध अफगाणिस्तान- १ डाव आणि ३०० धावा, मुल्लानपूर, २०२६*
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज- १ डाव आणि २७२ धावा, राजकोट, २०१८
भारत विरूद्ध अफगाणिस्तान- १ डाव आणि २६२ धावा, बंगळुरु, २०१८
भारत विरूद्ध बांगलादेश- १ डाव आणि २३९ धावा, मीरपूर, २००७
भारत विरूद्ध श्रीलंका- १ डाव आणि २३९ धावा, नागपूर, २०१७
