Team India Most Wins In T20I Cricket Record: भारत आणि जपान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २ धावांनी थरारक विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये suzuki cup चा मैत्रीपूर्ण सामना रंगला. या सामन्यात पावसाने हजेरी लावल्याने २० षटकांऐवजी ५-५ षटकांचा सामना खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३२ धावा केल्या.या धावांचा पाठलाग करताना जपानने ३० धावांपर्यंत मजल मारली. यासह भारतीय संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने एका मोठा रेकॉर्डवर नाव कोरलं आहे.

भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय

हा भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील २०० वा विजय ठरला. यासह भारतीय संघ हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विजय मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे. भारतीय संघाने कसोटी आणि वनडे क्रिकेटच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने २००६ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत ३ वेळा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. भारतीय संघाने २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात, २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळताना जेतेपदाचा मान पटकावला होता.

भारतीय संघाचा थरारक विजय

या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५ षटकांत ३२ धावा केल्या. यादरम्यान अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. तर संजू सॅमसनने ९ आणि शेवटी श्रेयस अय्यरने १६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना जपानला ३० धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.

भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या २९१ सामन्यांपैकी २०० सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसऱ्या स्थानी असलेल्या पाकिस्तानने २९९ पैकी १७४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने २६७ सामन्यांमध्ये १३७ सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या नावे २३५ सामन्यांमध्ये १३१ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने २३३ सामन्यांमध्ये १३० सामने जिंकले आहेत.