भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) नुकतेच खेळाडूंच्या मानधनात दुपटीने वाढ करूनही क्रिकेटपटूंमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. बीसीसीआयकडून अजूनही आपल्याला अपेक्षित मानधन मिळत नसल्याची खेळाडूंची खंत असल्याचे वृत्त क्रिकइन्फोने दिले आहे. बीसीसीआयच्या मिळकतीतील योग्य वाटा मिळावा यासाठी खेळाडूंनी काही महिन्यांपूर्वीच आवाज उठवला होता. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यानही खेळाडूंच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. खेळाडू आणि क्रिकेट बोर्डातील एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन बीसीसीआयने नुकतेच कसोटी, वनडे आणि ट्वेन्टी-२० सामन्यांसाठीच्या खेळाडूंच्या मानधनात दुपटीने वाढ देखील जाहीर केली.

 

मात्र, क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंच्या वेतन रचनेत पूर्णपणे बदल करण्याची गरज असल्याची भूमिका संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी घेतली आहे. खेळाडूंना संपूर्ण मिळकतीतील अपेक्षित वाटा मानधन स्वरूपात मिळावा यासाठी कुंबळे प्रयत्नशील आहेत. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीची भेट घेऊन कुंबळेंनी आपली बाजू मांडली आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात खेळाडू आणि अनिल कुंबळे सीओएची भेट घेणार आहेत. मात्र, सीओएकडून याबाबत अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

नुकतेच बीसीसीआयकडून ‘अ’ दर्जाच्या खेळाडूंचे मानधन ५० लाखांवरून १ कोटी करण्यात आले, तर ‘ब’ दर्जातील खेळाडूंचे मानधन २५ लाखांवरून ५० लाख करण्यात आले. याशिवाय ‘क’ गटातील खेळाडूंचे मानधन २५ लाख जाहीर केले होते. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर यांचेही मानधन ५० करण्यात आले.