scorecardresearch

टीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात

विराट आणि सुर्यकुमार यादवच्या धडाकेबाज खेळीने भारताचा विजय सुकर झाला.

टीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात
सौजन्य-बीसीसीआय

भारतीय संघाने या सामन्यात १८७ धावांचा ६ गडी राखून यशस्वी पाठलाग करत ही मालिका आपल्या नावे केली. सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांची आक्रमक अर्धशतके भारतीय संघाच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. आशिया चषकातील पराभवानंतर भारतीय संघ जोरदार ट्रोल झाला होता. पण बलाढ्य ऑस्ट्रेलियावरआजच्या तिसऱ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही २-१ अशी जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहा गडी राखून विजय मिळवता आली. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची खेळी साकारली. सुर्यकुमार यादव याला सामनावीराचा पुरस्कार दिला. अक्षर पटेलला मालिकावीराचा किताब देण्यात आला.

कॅमेरून ग्रीनचा तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने भारतीय गोलंदाजांना वाभाडे काढत तगडे आव्हान उभे केले. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ (१ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ बळी घेतले. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ गडी बाद केला.

सुर्यकुमार बाद झाला असला तरी कोहली मात्र खेळपट्टीवर उभा होता. सूर्या बाद झाल्यावर कोहलीने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाला विजयाच्या जवळ घेऊन गेला. सूर्या बाद झाल्यावर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला आणि त्याने कोहलीला चांगली साथ दिली. सूर्या बाद झाल्यावर कोहली अधिक जबाबदारीने खेळला. कोहली संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब कसे होईल, याचा विचार करत होता. त्यामुळे कोहलीने यावेळी आपला अनुभव पणाला लावला. सूर्या बाद झाल्यावर कोहलीने जास्त जोखीम घेतली नाही. पण सेट झाल्यावर मात्र कोहलीच्या फलंदाजी मधून चांगले फटके निघत होते आणि चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते.

मात्र, अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज असताना विराटने पहिला चेंडूवर षटकार मारला. मात्र, पुढील चेंडूवर तो बाद झाला. त्याने ४८ चेंडूंवर ६३ धावा केल्या. अखेरीस हार्दिक पंड्याने एक चेंडू शिल्लक असताना चौकार मारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या