India vs New Zealand Record:अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण न्यूझीलंडकडे पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे. दरम्यान ही ट्रॉफी जिंकताच भारतीय संघाकडे ३ मोठे रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. कोणते आहेत ते ३ रेकॉर्ड? जाणून घ्या.
पहिला रेकॉर्ड
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या करण्यात आले आहे. श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. याआधी झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धांमध्ये कुठल्याही यजमान संघाला जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. जर आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर हा रेकॉर्ड असेल. भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा पहिलाच यजमान संघ ठरेल.
दुसरा मोठा रेकॉर्ड
भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. जर आज होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला, तर भारतीय संघ हा सलग २ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावणारा जगातील पहिलाच संघ ठरेल.
तिसरा मोठा रेकॉर्ड
आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने २ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या यादीत भारतीय संघासह इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा समावेश आहे. या संघांनी देखील प्रत्येकी २-२ वेळा जेतेपद पटकावलं आहे. आता भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे. असं झाल्यास भारतीय संघ हा ३ वेळा टी-२० वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच संघ ठरेल.
