शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या श्रीलंका दौर्‍यावर आहे. तिथे त्यांना ३ एकदिवसीय सामने आणि तितक्याच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या दरम्यान, भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक वनडे जिंकणारा जगातील पहिला संघ होण्याची संधी आहे. सध्या टीम इंडिया या विक्रमापासून २ विजय दूर आहे.

एकदिवसीय इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेला ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. यानंतर टीम इंडिया ९१ विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानला हरवण्याची संधी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने ६१ विजय मिळवले आहेत.

कोलंबोत रंगणार सामने

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर दोन्ही संघ २१, २३ आणि २५ जुलै रोजी टी-२० सामने खेळतील. सर्व सामने कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवर होतील. श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक वनडे खेळण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल आहे. भारताने लंकेविरुद्ध १५९ सामने तर पाकिस्तान ११५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत कोणताही संघ १०० एकदिवसीय सामने खेळू शकलेला नाही.

हेही वाचा – महेंद्रसिंह धोनीला भेटला ‘देव’, तब्बल १३ वर्षानंतर स्वप्न झालं साकार

घरच्या मैदानावर श्रीलंकेचा पराभव करण्यात भारतीय संघ आधीच आघाडीवर आहे. त्यांनी आतापर्यंत श्रीलंकेला त्यांच्यात मातीत २८ सामन्यांत पराभूत केले आहे. या यादीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध १८ सामने जिंकले आहेत.

श्रीलंका दौर्‍यासाठी भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के गौतम, कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.