Team India Injured Players BCCI Update: भारतीय क्रिकेट संघात सध्या दुखापतींचं वादळ सुरू आहे. एकामागून एक खेळाडू दुखापतग्रस्त होत संघाबाहेर झाले आहेत. सध्याच्या संघाचा आणि भविष्यातील नियोजनाचा भाग असलेले एकूण १३ खेळाडू दुखापतींमुळे बंगळुरूस्थित ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये एकाच वेळी पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहेत. हे खेळाडू पुन्हा तंदुरुस्त होऊन मैदानात कधी परततील, यावर बीसीसीआयची वैद्यकीय टीम अहोरात्र काम करत आहे; कारण ही बाब सध्या भारतासाठी चिंतेचा मोठा विषय बनली आहे. भारताचे एका वेळी १३ खेळाडू दुखापग्रस्त आहेत. 

सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून दुखापतीमुळे दुखापतींमुळे अनेक खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. टीम इंडिया महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी तयारी करत असतानाच एक खेळाडूंच्या दुखापतीचा रिपोर्ट समोर आला आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, तीनही फॉरमॅटमधील तब्बल १३ आघाडीचे भारतीय क्रिकेटपटू सध्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये पुनर्वसन प्रक्रियेत आहेत.

माध्यमांतील वृत्तांनुसार, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्याव्यतिरिक्त नितीश कुमार रेड्डी, साई सुदर्शन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे प्रमुख खेळाडू सध्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये आहेत. त्याच वेळी, आकाश दीप, हिमांशू सिंग, अशोक शर्मा, सुयश शर्मा, युद्धवीर सिंग आणि रियान पराग यांसारखे युवा खेळाडूही दुखापतींशी झुंज देत आहेत.

भारताचे कोणते खेळाडू कोणत्या दुखापतींशी झुंज देत आहेत?

जसप्रीत बुमराह 

इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी बुमराहच्या डाव्या गुडघ्यामध्ये दुखापत असल्याने ३० जुलैपासून तो फिटनेसवर काम करत आहे.

हार्दिक पंड्या 

हार्दिकच्या डाव्या मांडीच्या ‘क्वाड्रिसेप्स’ स्नायूला दुखापत झाली होती. त्यानंतर, सरावादरम्यान त्याने चांगली सुधारणा दर्शवली आणि तो आठवड्याला १२ ते १५ षटकं ८० ते ९० टक्के वेगाने गोलंदाजी करत होता. मात्र, याच काळात त्याच्या उजव्या पायामध्ये (shin) वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्याच्या धावणं सध्या थांबवण्यात आलं आहे.

नितीश कुमार रेड्डी 

नितीश कुमार रेड्डीच्या डाव्या मांडीच्या दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया (रिहॅबिलिटेशन) वेगाने सुरू असून, तो आता ‘रिटर्न-टू-स्किल्स’ (कौशल्य-सराव पुन्हा सुरू करण्याच्या) टप्प्यावर पोहोचला आहे. त्याने गेल्या आठवड्यात १६ षटकं गोलंदाजी केली. 

साई सुदर्शन 

साई सुदर्शनने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा सराव पुन्हा सुरू केला आहे. त्याने नेट्समध्ये ७५ मिनिटं फलंदाजी केली आणि धावण्याचा सरावही (रनिंग ड्रिल्स) केला. मात्र, त्याच्या पायाच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला अजूनही वेदना होत आहेत. फलंदाजी आणि धावण्याच्या सत्रांचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवल्यानंतर, एमआरआय (MRI) स्कॅनद्वारे त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल.

हर्षित राणा

हर्षित राणा उजव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत आहे. २० जुलैला एनसीए (NCA) मध्ये दाखल झाला आहे. त्याच्या पुनर्वसनासोबतच आता कौशल्य-आधारित प्रशिक्षण सुरू केलं जात आहे.

वॉशिंग्टन सुंदर

वॉशिंग्टन सुंदर हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंजत आहे. २० जुलैला तो सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेससाठी पोहोचला होता. येत्या काही आठवड्यांत वर्कलोड वाढवून त्याला पुन्हा मैदानात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

वरूण चक्रवर्ती

वरुण चक्रवर्तीच्या डाव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आहे. आगामी आठवड्यांमध्ये त्याला वेगाने धावणं, अचानक दिशा बदलणं आणि ताकद वाढवण्याचा सराव (स्ट्रेंथ ट्रेनिंग) यांसारख्या कठोर सत्रांतून जावं लागेल.

आकाशदीप 

पाठीच्या खालच्या भागातील ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’मुळे आकाश दीप काही काळ मैदानापासून दूर होता. ‘रिटर्न-टू-प्ले’ (खेळात परतण्याबाबतचा) कार्यक्रम त्याच्यासाठी सकारात्मक ठरला आहे. आता त्याने क्रिकेटशी संबंधित प्रत्यक्ष सरावाला सुरुवात केली आहे.

हिमांशु सिंग

मुंबईचा वेगवान गोलंदाज हिमांशू सिंग उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (CoE) आहे. त्याने २८ जुलैपासून ‘स्पॉट बॉलिंग’ला सुरुवात केली आणि त्याला कोणताही त्रास जाणवला नाही.

अशोक शर्मा

अशोक शर्माची दुखापत या १३ खेळाडूंच्या तुलनेत सर्वात गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. २६ जुलै रोजी झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर त्याला पाठीच्या खालच्या भागात तीव्र ताण जाणवला. एमआरआय (MRI) आणि सीटी स्कॅनच्या प्रतिमा न्यूझीलंडमधील मणका-विकार तज्ज्ञ डॉ. रोवन यांच्याकडे पाठवण्यात आल्या. तपासणीअंती ‘एल१ पार्स इंटरआर्टिक्युलॅरिस’ (L1 pars interarticularis) मध्ये तीव्र ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ आणि डाव्या बाजूच्या ११ व्या बरगडीला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झालं.

सुयश शर्मा

सुयश शर्माच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये ‘पॅटेलर इन्सर्शनल टेंडिनोपॅथी’ (patellar insertional tendinopathy) असल्याचे निदान झालं. सुरुवातीच्या उपचारांचा अपेक्षित परिणाम न झाल्यामुळे, २८ जुलै रोजी त्याला पीआरपी (PRP) इंजेक्शन देण्यात आलं. सध्या त्याच्या गुडघ्यांना बळकट करण्यावर भर देऊन, एका नियोजित पुनर्वसन प्रक्रियेद्वारे (structured rehabilitation) त्याचे उपचार सुरू आहेत.

युधवीर सिंह-रियान पराग

युधवीर सिंगच्या उजव्या खांद्याच्या समस्येत लक्षणीय सुधारणा झाली आहे. तो संपूर्ण शरीराच्या ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’सोबतच खांद्यासाठीचे पुनर्वसन व्यायाम (रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस) करत आहे. तर रियान पराग सध्या उजव्या खांद्याच्या शस्त्रक्रियेनंतर सावरत आहे.