बांगलादेशातील सिल्हेट येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. स्मृतीने २५ चेंडूत ५० धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने ३ षटकात ३ गडी बाद केले तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्ती शर्माला मालिकाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारताने लंकेचे ६६ धावांचे आव्हान पार करताना आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मंधानाने आक्रमक फटकेबाजी करत भारताला ३ षटकात २५ धावांपर्यंत पोहचवले. मात्र लंकेनेही भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. झुंजार फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेच्या रणवीराने गोलंदाजीतही चमक दाखवत भारताला पहिला धक्का दिला. तिने ८ चेंडूत ५ धावा करणाऱ्या शफाली वर्माला तंबूत धाडले. कविशा दिलहारीने भारताला दुसरा धक्का दिला. इन फॉर्म जेमिमाह रॉड्रिग्जचा २ धावांवर त्रिफळा उडवला.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामी फलंदाज स्मृती मंधाना हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने २५ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५१ धावा करत अर्धशतक साकारले. या धावा करताना तिने ३ षटकार आणि ६ चौकारही मारले. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट २०४ इतका होता. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाबाद ११ धावा केल्या. या दोघींच्या फटकेबाजीमुळे भारताने हा कमी आव्हानाचा सामना सहजरीत्या आपल्या नावावर केला. यावेळी श्रीलंका संघाकडून गोलंदाजी करताना इनोका रणवीरा आणि कविशा दिलहारी यांनी प्रत्येकी एक विकेट आपल्या नावावर केली.

तत्पूर्वी, श्रीलंकेची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी परतला होता एका क्षणी ५० धावा तरी होतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून फक्त दोघीनाच दोन आकडी संख्या गाठता आली. इनोका रणविरा आणि ओधाडी रणसिंघे यांनी अनुक्रमे १८ आणि १३ धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी तिला साथ देत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.